औरंगाबाद : सोशल मीडियावरून अफवा पसरविल्या जाऊ नये म्हणून शहरात १२ तास इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आजच्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. यासोबतच सर्व शहरातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.
भीमा-कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात तणावाचे वातावरण आहे. सोशल मीडियावरून अफवा पसरवल्या जाऊ नये यामुळे शहरात १२ तास इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री १२ ते आज दुपारी १२ पर्यंत शहरात इंटरनेट सेवा बंद असेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रथम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. भीमा-कोरेगाव येथील घटनेचे पडसाद विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात उमटल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने मंगळवारच्या सर्व परीक्षा रद्द केल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी जाहीर केले. प्रभारी पोलीस आयुक्तांनी कुलसचिव डॉ. पांडे यांच्याशी मंगळवारी संपर्क साधत खबरदारीचा उपाय म्हणून विविध महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या परीक्षा रद्द करण्याची विनंती केली होती. यावर परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके, डॉ. पांडे यांच्या संयुक्त बैठकीत सर्व प्रकारच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनीही कोणाताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विद्यापीठ बंद ठेवण्याचे लेखी आदेश सर्व यंत्रणांना दिले.