पैठण : पैठण शहरात मोबाईल इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या दुर्लक्षामुळे इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. या प्रकाराने ‘नेट’करी त्रस्त झाले असून सध्या परीक्षेचा काळ सुरू असल्याने विविध अर्ज आॅनलाइन भरावे लागत असून इंटरनेटवर संबंधित संकेतस्थळ ओपन होत नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.त्यातच नाथषष्ठी तोंडावर आल्याने नाथषष्ठी कालावधीत तर कॉल करणे सुद्धा अवघड होऊन बसत असल्याने संबंधित कंपन्यांनी याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पुढे आली आहे.पैठण शहरात इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांनी थ्रीजी, फोरजी सेवा देत असल्याचे सांगून ग्राहकांंना तसे शुल्क आकारले आहे. प्रत्यक्षात मात्र शहरात थ्रीजी फोरजी तर सोडा साधी केबीमध्येही इंटरनेट स्पीड मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. इंटरनेट सेवा सुरळीत मिळत नसल्याने अनेक मोबाईलधारकांनी दोन दोन कंपन्यांची सेवा विकत घेतली आहे. मात्र अनेक नामवंत कंपन्या सेवा देण्यास असमर्थ ठरत असल्याने ग्राहकांना दोन कंपन्यांच्या सेवा घेऊनही उपयोग झालेला नाही. यामुळे ग्राहकांचा खिसा मात्र खाली होत आहे. सध्या इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत असून तासंतास सुरळीत होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यातच नाथषष्ठीमुळे पैठण शहरात लाखोंच्या संख्येने मोबाईलधारक येत असल्याने टॉवरवर लोड येऊन साधा कॉल करणे सुध्दा अवघड होऊन बसते. हा गत काही वर्षाचा अनुभव लक्षात घेता मोबाईल इंटरनेट सेवा देणाºया कंपन्यांनी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. दरम्यान, इंटरनेट सेवा सुरळीत करावी व तात्पुरते मोबाईल टॉवर उभे करावे, अशी मागणी होत आहे.
पैठणमध्ये इंटरनेट सेवा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:50 AM