उदगीर / देवणी : मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी उदगीर, देवणी तालुक्यात विविध ठिकाणी ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात आले़ दुपारी २ वाजेपर्यंत चाललेल्या या आंदोलनामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती़ कर्नाटक-तेलंगणातील मोठ्या शहरांना जोडणारा आंतरराज्य रस्ताही ब्लॉक झाल्याने वाहनांच्या दूरदूरवर रांगा लागल्या होत्या़उदगीर शहरातील शिवाजी चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले़ सकाळी १० वाजता छत्रपती शिवरायांना अभिवादन करुन सुरु झालेले हे आंदोलन दुपारी जवळपास २ वाजेपर्यंत चालले़ यावेळी समाजबांधवांनी आपली मनोगते व्यक्त केली़ वर्षानुवर्षे होत असलेला अन्याय दूर सारुन मराठा समाजाला आरक्षण द्यावे, कोपर्डी घटनेतील पीडितेला न्याय मिळवून द्यावा, महिला संरक्षणविषयक कायदे कडक करावेत, असे घोषवाक्य असलेले फलक घेवून शहरातील तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील समाजबांधव आंदोलनात उतरले होते़ शिवाय, आंदोलनात मुस्लिम व अन्य समाजातील बांधवही समर्थनार्थ सहभागी झाल्याचे दिसून आले़उदगीर तालुक्यातील मोघा येथे सकाळी ८ वाजताच आंतरराज्य मार्गावर आंदोलनाला सुरुवात झाली़ यात मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते़ दुपारी १२ वाजेपर्यंत हे आंदोलन चालले़ आपल्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देऊन आंदोलनाचा समारोप करण्यात आला़ दरम्यान, हा मार्ग अत्यंत वर्दळीचा असल्याने मोठ्या शहरांकडे धावणाऱ्या अवजड वाहनांसह इतर वाहनांच्याही दूरदूरवर रांगा लागल्या होत्या़ उदगीर तालुक्यातील वाढवणा पाटी येथेही सकाळी ९ वाजता जिजाऊ वंदनेने आंदोलनाला सुरुवात करण्यात आली़ यावेळी अनेकांनी आपली मनोगते व्यक्त करतानाच मराठा समाजाच्या मागण्यांवर प्रकाश टाकला़ यावेळी परिसरातील वाढवणा (बु़), वाढवणा (खु़), एकुर्का रोड, उमरगा मन्ना, किनी यल्लादेवी, सुकणी, शेळगाव, कल्लूर, खेर्डा खुर्द व अन्य गावातील नागरिकही आंदोलनात सहभागी झाले होते़ आंदोलनास पाठिंबा दर्शवीत वाढवणा पाटी येथील सर्व व्यापारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती़ उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथेही नांदेड-बीदर मार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले़ जवळपास चार तास चाललेल्या या आंदोलनामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ दुपारी प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाचा समारोप करण्यात आला़ याशिवाय, तालुक्यातील शेल्हाळ, तोंडचिर, येणकी-माणकी, ल्^ाातूर-उदगीर रोडवरील लोहारा, करडखेल, डिग्रस, जळकोट तालुक्यातील घोणसी येथेही जोरदार आंदोलन झाल्याने ग्रामीण भागातील वाहतूक ठप्प राहिली़ देवणी तालुक्यातील वलांडी, तोगरी मोड व देवणी शहरातही सकल मराठा समाजाच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले़ वलांडी येथे चार तास चाललेल्या आंदोलनामुळे निलंगा-उदगीर या प्रमुख मार्गासह कर्नाटकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वर्दळही ठप्प झाली़ देवणी शहरातील निलंगा-उदगीर मार्गावरील मुख्य चौकात आंदोलन करण्यात आले़ त्यामुळे मुख्य मार्गासह ग्रामीण भागातील वाहतूक ठप्प झाली़
‘इंटरस्टेट ब्लॉक’
By admin | Published: January 31, 2017 11:14 PM