विजय मुंडे , उस्मानाबादवृद्धापकाळात आरोग्याच्या काळजीसाठी व्यायाम जितका महत्त्वाचा तितकाच मानसिक आधारही महत्त्वाचा़़़ जिल्हा क्रीडासंकुलावर सकाळ-सायंकाळ फिरण्यासाठी येणाऱ्या वयोवृध्दांनी या दोन्ही बाबींचा मेळ साधत आपल्या सवंगड्यांशी आपुलकीचं नातं जपलं आहे़ विविध विषयावर होणारी चर्चा, एकमेकांचे साजरे होणारे वाढदिवस आणि कोणी आजारी पडलं किंवा काही अडचण निर्माण झाली तर सर्वांचे पुढे येणारे हात़़़ ज्येष्ठांची ही दिनचर्या केवळ फेसबूक आणि वॉटस्अपवर सोबत असलेल्या युवा मित्रांसाठी आदर्शवत अशीच आहे़ वयाची साठी ओलांडलेल्या या वयोवृध्द सवंगड्यांनी मागील १५ वर्षापूर्वी सुरू केलेला हा दैनंदिन कार्यक्रम आजही सुरू आहे़स्पर्धेच्या युगातील युवा पिढी ही केवळ फेसबूक, वॉटस्अप सारख्या सोशल मीडियावरून सवंगड्यांच्या सानिध्यात आहे़ मात्र, या युवा पिढींसमोर एक वेगळा आदर्श ठेवण्याचे काम उस्मानाबाद शहरातील श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलावर येणाऱ्या ज्येष्ठांनी ठेवला आहे़ ही २५ ते ३० मंडळी दररोज सकाळी आणि सायंकाळी नित्यनियमाने फिरण्यासाठी येतात़ शहरातील जिल्हा परिषदेतून क्लार्क म्हणून सेवानिवृत्त झालेले आऱव्हीक़ुलकर्णी यांच्यासह काही ज्येष्ठांनी १५ वर्षांपूर्वी तुळजाभवानी क्रीडा संकुलावर फिरण्यासाठी येणाऱ्या वयोवृध्दांना एकत्र करून श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी मित्र- मंडळाची स्थापना केली़ या मंडळातील बबनराव लोकरे, मोहसीन शेख, बिभिषण जगदाळे विठ्ठलराव शेळके, सुरेश देशमुख, अंबादास दानवे यांच्यासह इतर काहींनी मागील काही वर्षापासून या ग्रुपची वाटचाल नित्यनियमाने सुरू ठेवली आहे़ प्रारंभी बोटावर मोजण्याइतके सदस्य असलेल्या या मित्रमंडळात सध्या ३७ सदस्य आहेत़ ही मंडळी मासिक ५० रूपये प्रमाणे वर्गणी गोळा करून एकमेकांचे वाढदिवस साजरे करण्यासह इतर उपक्रम राबवितात़ सायंकाळी ४़३० ते ७़३० या तीन तासाच्या काळात ही मंडळी एकमेकांच्या सानिध्यात असतात़ घरातील परिस्थिती असो किंवा इतर कारणांनी येणारा मानसिक तणाव हा या ज्येष्ठ सवंगड्यांच्या सानिध्यात मिळणाऱ्या विरंगुळ्यामुळे दूर होतो़ ग्रुपमधील कोणी आजारी पडले असेल तर त्याच्या घरी जावून भेटणे, अडचणीत असेल तर आवश्यक ती मदत करून मानसिक आधार देण्याचे कामही ही मंडळी करीत आहेत़ या मित्रमंडळींची सकाळ, सायंकाळ नित्य भेट ठरलेलीच! राजकीय, शैक्षणिक अथवा इतर विषयावर यांच्यामध्ये चांगलीच चर्चा होते़ एकमेकांचे सुख-दु:ख, अडचणी जाणून घेत एकमेकांना आधार देण्याचे काम हे ज्येष्ठ सवंगडी नित्यनियमाने करीत आहेत़ तीन तासानंतर ‘एफ़एम’ वरील सायंकाळी ७ च्या बातम्या संपल्यानंतर ही मंडळी आपापल्या घरी परततात़ घराकडे परतताना दुसऱ्या दिवशी एकमेकांना भेटण्याची ओढ मात्र, या सर्वच सवंगड्यांच्या मनात कायम असते़
सेवानिवृत्तीनंतर मिळाले जिव्हाळ्याचे मित्र
By admin | Published: February 22, 2016 12:25 AM