औरंगाबाद : आधुनिक तांत्रिक साहित्याद्वारे फसवणूक करून पोलीस खात्यात भर्ती होण्याचा डाव फसल्याची घटना मंगळवारी (दि. ७) निदर्शनास आली. पोलीस भरतीत स्वत: परीक्षा देण्याऐवजी अल्पवयीन मुलीला परीक्षेला पाठवणारी महिला परीक्षार्थी पूजा रामदास दिवेकर (२४, रा. टीव्ही सेंटर, स्वामी विवेकानंद नगर) आणि तिचा साथीदार आकाश भाऊलाल राठोड (२२, रा. बेगानाईक तांडा, आडगाव ता. औरंगाबाद) या दोघांना ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. डी. श्रृंगारे / तांबडे यांनी गुरुवारी दिले. त्या दोघांकडून मोबाईलसह मायक्रोमाईक, स्पाय डिव्हाईस, ब्ल्यूटूथ, आधार कार्ड, व एक मोबाईल लपवून ठेवण्यासाठी तयार केलेला खास टी शर्ट असा सुमारे १० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
अल्पवयीन परीक्षार्थीला मिळणार होते दहा हजार रुपये
याबाबत सातारा पोलीस ठाण्याच्या अंमलदार भैरवी बागुल (३६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ७ सप्टेंबर रोजी पोलीस ड्रायव्हर पदासाठी लेखी परीक्षा होती. फिर्यादी व त्यांचे सहकारी बीड बायपास येथील एमआयटी इंजिनिअरिंग महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर कर्तव्यावर होत्या. परीक्षा सुरु होण्याआधी एक अल्पवयीन मुलगी धावत परीक्षा केंद्राच्या गेटजवळ आली. पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी मुलीला थांबविले. तिची चौकशी केली असता ती पूजा दिवेकर या परीक्षार्थीच्या नावावर परीक्षा देण्यासाठी आली होती. परीक्षा देण्यासाठी मुलीला १० हजार रुपये व परीक्षार्थी पास झाल्यावर एक लाख रुपये देण्याचे आश्वासन रंजीत राजपूत (बहुरे) (रा. शेकटा ता. जि. औरंगाबाद) याने दिल्याचे तिने पोलिसांना सांगितले. याबाबत सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याता आला आहे.
आकाशच्या ऐवजी भागवतने दिली होती परीक्षा
पोलिसांनी सीमकार्ड आधारे तपास करून आकाश राठोड याला ८ सप्टेंबर रोजी रात्री अटक केली. त्याने डीव्हाईसमध्ये लावलेले मास्टरकार्ड मधील सीमकार्ड त्याच्या नावावर असून ते रणजित राजपूत याला वापरण्यासाठी दिल्याचे कबूल केले. आकाशने आरपीएफ पदाचा फाॅर्म भरला होता. त्याची परीक्षा पुण्याला झाली होती. त्या परीक्षेत आकाशने त्याच्या जागी भागवत नावाच्या तरुणाला पाठविल्याचे देखील समोर आले आहे. दरम्यान पोलिसांनी परीक्षार्थी पूजा दिवेकर हिला अटक केली. तिने सांगितले की, अल्पवयीन मुलीला रणजित राजपूत, सचिन राजपूत आणि राजू नावाचा त्यांचा एक साथीदार तिच्या जागी परीक्षेसाठी आणल्याचे सांगितले.
अल्वयीन मुलीने सुद्धा नुकतेच दिली होती परीक्षा
वरील दोघा आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील सुनील जोंधळे यांनी न्यायालयास विनंती केली की, गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार रणजित राजपूतसह सचिन राजपूत व राजू याला अटक करायची आहे. गुन्ह्यात आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत काय, त्यांचा शोध घेऊन त्यांना देखील अटक करायची आहे. अल्पवयीन मुलीने १५ दिवसांपूर्वी क्लर्क (कारकून) पदाची परीक्षा दिलेली आहे त्याचा तपास करायचा आहे. आरोपी आकाशच्या जागी परीक्षा देणाऱ्या भागवतला अटक करायची आहे. आरोपींनी डीव्हाईस कोठून आणले, कोण कोणत्या परीक्षांसाठी त्याचा उपयोग केला, तसेच आरोपींनी कोणत्या जिल्ह्यांमध्ये डमी विद्यार्थ्यांचा उपयोग केला, याचा तपास बाकी असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती केली.