परभणी : जिल्ह्यातील विविध भागांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी बंधाऱ्यामध्ये राखीव ठेवलेल्या पाण्याचा चोरून उपसा होत असल्याचा प्रकार मंगळवारी जिल्हाभरात ठिकठिकाणी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आला आहे़ विशेष म्हणजे, पैठणच्या जायकवाडी धरणातून केवळ पिण्यासाठी मिळालेल्या पाण्यावरही जिल्ह्यात डल्ला मारला जात आहे़ जिल्ह्यात पाणी संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे़ परभणी हा सुपीक जमिनीचा जिल्हा असल्याने आणि गोदावरीसह पूर्णा, वाण, बोरणा, दुधना अशा नद्यांचा प्रवाह जिल्ह्यातून आहे़ त्यामुळे दरवर्षी जिल्ह्यात पाणीटंचाई भेडसावत असली तरी ही परिस्थिती काही महिन्यांपुरतीच असायची़ परंतु, यावर्षी मात्र नोव्हेंबर महिन्यापासून परभणीकरांची पाण्यासाठी धावाधाव सुरू आहे़ जिल्ह्यातील सर्वच्या सर्व प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत़ काही प्रमाणात पाणी शिल्लक आहे़ ते पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले़ जिल्ह्याची टंचाई गंभीर स्वरुप धारण करीत असल्याने जायकवाडी धरणातून पाणी मागविण्यात आले़ काही दिवसांपूर्वी हे पाणी परभणी जिल्ह्यात दाखल झाले असून, पाथरी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी रामपुरी बंधाऱ्यात, मानवतसाठी झरी तलावात आणि गंगाखेड शहरासाठी मुळी बंधाऱ्यात पाणी साठविण्याचे नियोजन करण्यात आले़ परंतु, पिण्यासाठी राखीव असलेले हे पाणी काही भागात अवैधरित्या विद्युत मोटारी लावून उपसा करण्याचा प्रकार ‘लोकमत’ने मंगळवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आला़ यावर वेळीच पायबंद घातला नाही तर आगामी काळात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होवू शकते़ (प्रतिनिधी)
पिण्याच्या पाण्याचा सिंचनासाठी अवैध उपसा
By admin | Published: March 16, 2016 8:30 AM