वाळूज महानगर : सिडको जलवाहिनीवरील अनधिकृत नळ तोडणी मोहीम राबविण्यास प्रशासन टाळाटाळ केली जात असल्याचे उघडकीस येत आहे. पोलीस बंदोबस्त देण्यास तयार असताना अधिकारी मात्र पोलीस बंदोबस्ताचे कारण पुढे असल्याचे दिसून येत आहे. दीड महिन्यापासून या मोहिमेला ब्रेक लागल्याने प्रशासनाच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सिडको अंतर्गत येणाऱ्या नागरी वसातीला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने वडगाव मार्गे जलवाहिनी टाकण्यात आली आहे. परंतू या जलवाहिनीवर अनेकांनी अनधिकृत नळजोडणी घेतलेली आहे. यामुळे जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. यााीमुळे सिडकोतील नागरी वसाहतीला कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून प्रशासनाने या जलवाहिनीवरील अनधिकृत नळ जोडणी तोडण्याचा निर्णय घेतला.
या अनुषंगाने प्रशासनाने स्थानिक ग्रामपंचायतीला नळ जोडणी काढून घेण्याविषयी नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. परंतू उन्हाळा असल्याने ग्रामपंचायतीने काही कालावधीसाठी नळ जोडणी तोडू नये अशी सिडकोला विनंती केली होती. मात्र सिडकोने नळजोडणी तोडण्याचा निर्णय कायम ठेवला होता. कारवाईदरम्यान विरोध होण्याची शक्यता असल्याने पोलीस बंदोबस्तासाठी वाळूज एमआयडीसी पोलिसांना पत्रही दिले होते.
९ जुलैला पोलीस बंदोबस्तात नळ तोडणी मोहिम राबवून अनधिकृत नळावर कारवाई केली जाणार होती. परंतू दोन महिने होत आले तरी अद्याप या कारवाई सुरु झालेली नाही. या विषयी सिडकोचे वसाहत अधिकारी गजानन साटोटे म्हणाले की, पोलीस बंदोबस्त मिळालेला नाही.
बंदोबस्त मिळताच कारवाई केली जाईल. तर शासकीय जागेवर अतिक्रमण किंवा इतर कारवाई प्रशासनाकडून केली जात असेल व त्यांना पोलिसांची आवश्यकता असेल तर त्यांनी तसे पत्र द्यावे, आम्ही केव्हाही तयार आहोत, असे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल गायकवाड यांनी सांगितले.