तक्रारीत नमूद केले की, सन २०१९ ते ३१ मार्च २०२१ या सलग तीन वर्षांच्या आर्थिक वर्षांत पाटबंधारे विभागाच्या एम ॲण्ड रेग्यूलर व पार्ट १ या विशेष दुरुस्ती कामासाठी नांदूर मधमेश्वर विभागाकडे बोरदहेगाव, नारंगी, कोल्ही, बिलोणी, सटाणा, खंडाळा, जरुळ या आठ मध्यम लघुसिंचन प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीकरिता निधी उपलब्ध करून दिला होता. विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामांच्या दोन लाखांच्या निविदा काढून मर्जीतील कंत्राटदारांना काम देऊन अनियमितता केली. निविदेप्रमाणे आठ प्रकल्पस्थळी माती, मुरुम तसेच किरकोळ दुरुस्तीचे कोणतीही कामे न करता कागदोपत्री कामे पूर्ण झाल्याचे दाखवून मूल्यांकन पुस्तिकेद्वारे शासनाचा निधी कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी संगनमताने लाटल्याची तक्रार करण्यात आलेली आहे.
कार्यालयातून संचिका गायब
नांदूर मधमेश्वर विभागाच्या अखत्यारीत आठ प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाबाबत तक्रारदार अजित राजपूत, लक्ष्मण नवले यांनी कार्यालयाकडे महिती मागितली असता, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली, तसेच बोगस कामांचे पितळ उघडे पडेल, या भीतीने संचिका गायब केली असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई न केल्यास पाटबंधारे विभागासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशाराही राजपूत व नवले यांनी दिला आहे.