छत्रपती संभाजीनगर: रामनवमीच्या आदल्या रात्री किराडपुरा येथे झालेल्या जाळपोळ प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायमुर्तीमार्फत करावी, तसे आदेश राज्य सरकारला द्यावे अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याकडे एका पत्राच्या माध्यमातून केली आहे.
खासदार इम्तियाज जलील यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दिलेल्या पत्रात नमुद केले की, ३० मार्च २०२३ रोजी रामनवमीच्या आदल्या रात्री किराडपुरा भागात जाळपोळीची दुर्देवी घटना घडली. यात पोलिसांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जाळपोळ सुरु असताना मी स्वतः मंदिरात २ तासांहून अधिक काळ उपस्थित होतो. यावेळी तेथे केवळ १५ पोलीस होते. त्यांना मंदिराचे रक्षण आणि जाळपोळ, दगडफेक करणार्या जमावाला तोंड देण्याचे काम सोपविण्यात आले होते. त्या रात्री घडलेल्या सर्व घडामोडींचा मी स्वतः साक्षीदार असून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात, असा आरोप खा. इम्तियाज यांनी केला आहे. तसेच या षडयंत्रामागे कोण आहेत याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारला उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी पंतप्रधानांना खा. जलील यांनी केली आहे.
पत्रातून अनेक प्रश्न केले उपस्थित समाजकंटकांना हिंसाचार करण्यास मोकळे का सोडण्यात आले ? त्या रात्री पोलिसांच्या १३ गाड्या जाळण्यात आल्या, तेव्हा पोलिस कुठे गेली होती? हा मोठा प्रश्न आहे. अग्निशमन दलाच्या गाड्यांना का थांबवण्यात आले ? सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे? असे अनेक गंभीरस्वरुपाचे प्रश्न खा. जलील यांनी पत्रातून उपस्थित केले आहेत.