छत्रपती संभाजीनगर : माजी पालकमंत्री आ. अब्दुल सत्तार यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या कामांची, असमान व अखर्चित निधी प्रकरणी प्रशासनाकडून माहिती मिळाल्यानंतर चौकशी करण्यासह जिल्ह्यातील गुंडगिरीचा नायनाट करण्यासाठी जिल्हाधिकारी, पाेलिस आयुक्त, पोलिस अधीक्षकांना संयुक्तपणे कारवाईचे आदेश दिल्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी गुरुवारी डीपीसीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बीडमध्ये ७३ कोटी रुपयांच्या अनियमित कामांबाबत चौकशी होणार आहे, येथेही तशीच चौकशी करणार काय, यावर पालकमंत्री शिरसाट म्हणाले, अनियमित कामांची चौकशी करण्यात येणारच आहे. त्यात कुणालाही सोडणार नाही.आ. सत्तार आणि तुमच्यात दिलजमाई झाल्याची चर्चा आहे, याबाबत वरिष्ठांनी काही सूचना दिल्या काय, यावर शिरसाट म्हणाले, वरिष्ठांनी काहीही सूचना दिल्या नाहीत. दिलजमाई, खेळीमेळीचे वातावरण असा मुद्दा नाही. चांगल्या कामात अडचण आणू नये, सर्वांनी सहकार्य करावे, अशा खेळीमेळीच्या वातावरण विनावाद बैठक झाली.
एकाच तालुक्याला जास्त निधी दिला गेला, तत्कालीन पालकमंत्र्यांचे निर्णय, त्यांनी दिलेल्या मंजुऱ्यांबाबत काय निर्णय घेतला, असे विचारता शिरसाट म्हणाले, जिल्हा प्रशासनाकडून अहवाल आल्यानंतर ज्या कामांबाबत संशय आहे, त्याची निश्चितपणे चौकशी करण्यात येईल. अखर्चित, असमतोल निधीबाबत चौकशी होईल. यावर विराेधी पक्षासह सर्व आमदारांनी चर्चा केली.
गुंडगिरीचा नायनाट करणारचजिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, पोलीस आयुक्तांना आज स्पष्टपणे आदेश दिले आहेत. संयुक्त कारवाईसाठी सूचना केल्या आहेत. यात अमली पदार्थ, पत्त्याचे क्लब, वाळूमाफिया, गांजा, बटनविक्री, चरस विक्रीबाबत कारवाईचे आदेश दिले आहेत. शहरासह जिल्ह्यात क्राइम वाढत आहे.
नो काॅमेंट्स करीत आ. सत्तारांचा काढता पाय....पालकमंत्री शिरसाट यांनी तुमच्या कार्यकाळातील कामांची चौकशी करण्यासह सिल्लोडसह जिल्ह्यातील गुंडगिरी संपविण्याबाबत चंग बांधला आहे. त्याचे पडसाद आजच्या बैठकीत उमटले काय, यावर आ. अब्दुल सत्तार म्हणाले, सर्व काही खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. गुंडगिरी, चौकशी यावर नो काॅमेंट्स म्हणत आ. सत्तार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून काढता पाय घेतला.
त्या शाळेची मान्यता रद्द करासावंगी-नायगाव येथील शाळेतील विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचारप्रकरणी बैठकीत शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी सदस्यांनी केली. पालकमंत्र्यांनी याबाबत प्रशासनाने प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली.महापालिकेने व्याजासह मालमत्ता करवाढीबाबत नोटिसा दिल्या आहेत. याबाबत बैठक घेऊन अवास्तव व्याजदराबाबत पालिकेला सूचना करण्यात येतील, असेही शिरसाट म्हणाले.
प्रशासकीय अधिकाऱ्यांची धाकधूकपालकमंत्री होण्यापूर्वी शिरसाट यांनी सिल्लोडसह जिल्ह्यातील गुंडगिरी संपविण्याची व डीपीसीतील कामे रद्द करण्यासह गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यावर आ. सत्तार यांनी शहरात मेळावा घेत जशास तसे उत्तर दिले हाेते. आ. सत्तार पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी शिरसाटांना डिवचले होते. शिरसाट पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनीही वचपा काढण्यासाठी आरोपांचे बाण सत्तारांवर डागले. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या बैठकीत शिरसाट आणि माजी पालकमंत्री आ. सत्तार यांच्यात खडाजंगी होईल, अशी शक्यता होती. यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्येही धाकधूक होती. परंतु, बैठकीत कोणताही वाद झाला नाही. तीन तास बैठक शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.