औरंगाबाद : आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नावाखाली खासगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या घरी काम करणाऱ्या व्यक्तींना कोरोना योद्धा दाखवून लस देण्यात आल्याच्या प्रकाराची महापालिकेने गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे. संबंधित खासगी रुग्णालयाला याप्रकरणी खुलासा करण्यासंदर्भात पत्र देण्यात आले आहे. यासह प्रत्येक खासगी रुग्णालयालाही महापालिकेकडून पत्र देण्यात येत आहे.
देशभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे; मात्र डॉक्टरांच्या घरी काम करणाऱ्या व्यक्तींना लस देण्यात आली. हा प्रकार ‘लोकमत’ने १ फेब्रुवारी रोजी ‘खासगी डॉक्टरांच्या घरी काम करणाऱ्यांना डोस’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित करून समोर आणला. या प्रकाराची महापालिकेने गांभीर्याने दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे.
जिल्ह्यात जवळपास ३३ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली; परंतु यात रुग्णसेवेशी संबंध नसलेल्या लोकांचीही नोंदणी झाल्याचे दिसते. शहरातील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरकडे घरी काम करणाऱ्या व्यक्तीला डोस देण्यात आला. लसीकरणासाठी नोंदणी करताना त्यांना रुग्णालयाचे कर्मचारी म्हणून नोंदणी केली. या रुग्णालयासह सर्वच रुग्णालयांना पत्राद्वारे या बाबीची विचारणा केली जात आहे.
लस सर्वांनाच, पण क्रम ठरलेलासर्व रुग्णालयांना पत्र देऊन असा कोणताही प्रकार करू नये, अशी सूचना करण्यात आली आहे. गाडे हॉस्पिटललाही पत्र देऊन याप्रकरणी खुलासा करण्याची सूचना करण्यात आली आहे. सत्यता काय आहे, हे पाहिले जाईल. लस ही सर्वांनाच दिली जाणार आहे; परंतु त्याचा क्रम ठरलेला आहे.- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.