लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पाच वर्षांपूर्वी शहरात झालेल्या श्रुती भागवत खून प्रकरणाचा तपास अहवाल मंगळवारी (दि.१० आॅक्टोबर) न्या. एस.एस. शिंदे व न्या. मंगेश पाटील यांच्या खंडपीठात सादर करण्यात आला.खंडपीठाच्या आदेशानुसार गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधीक्षक आय.एन. पठाण यांनी सहायक सरकारी वकील प्रीती डिग्गीकर यांच्यामार्फत मंगळवारी सादर केलेल्या तपास अहवालाबाबत न्यायालयाने समाधान व्यक्त केले.उल्कानगरी या उच्चभ्रू वसाहतीमधील रहिवासी श्रुती विजय भागवत यांचा १७ एप्रिल २०१२ रोजी मध्यरात्रीनंतर अज्ञात मारेकºयांनी खून केला. या खुनाचा तपास लागत नाही म्हणून श्रुती भागवत यांचे बंधू मुकुल करंदीकर यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेची सुनावणी मंगळवारी झाली. तपास अधिकारी पठाण यांनी दहा पानी तपास अहवाल सादर केला.श्रुती भागवत यांच्या पाठविण्यात आलेल्या मोबाइल हँडसेटचे परीक्षण केले जाणार आहे. त्यांच्या मोबाइलमधून डिलिट केलेल्या एसएमएसविषयी माहिती प्राप्त होईल. त्याचा अभ्यास करून तपास केला जाईल, असे या अहवालात म्हटले आहे. हा गुन्हा घडून पाच वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ झाला आहे. त्याचा विचार करता त्या भागात राहणारे आणि सध्या राहत असलेल्या व्यक्तींना विश्वासात घेऊन अधिक तपास करावयाचा आहे, असे पठाण यांनी या अहवालात म्हटले आहे.फिंगर प्रिंट, डीएनए अहवाल यासंबंधी तज्ज्ञांना समक्ष भेटून आणि चर्चा करून त्या अनुषंगाने तपास करावयाचा आहे. हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार किंवा हत्या करण्याची सुपारी घेऊन झाला आहे का, यादृष्टीने तपास करावयाचा आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. सद्य:स्थितीत गुन्हा उघडकीस येण्याइतपत उपयुक्त माहिती प्राप्त झालेली नाही, असेही पठाण यांनी या अहवालात म्हटले आहे.
श्रुती भागवत खून खटल्याचा तपास अहवाल खंडपीठात सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:13 AM