औरंगाबाद : राज्यात आगामी काळात अन्य प्रक्रिया उद्योगात १० हजार कोटींची गुंतवणूक होईल. ही गुंतवणूक व्हावी, यासाठी केंद्रीय अन्न व प्रक्रिया उद्योग मंत्रालयात राज्यात २,५०० कोटींतून १०९ सुविधा प्रकल्पांची कामे करण्याची योजना आखल्याचे केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
पैठण तालुक्यातील धनगाव येथील पैठण मेगा फूडपार्क प्रा.लि.च्या उद्घाटनप्रसंगी बादल बोलत होत्या. याप्रसंगी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, महापौर नंदकुमार घोडेले, खा. रावसाहेब दानवे, खा. चंद्रकांत खैरे, आ. संदीपान भुमरे, आ. अतुल सावे, डॉ. प्रकाश केसरवाल, नाथ गु्रपचे नंदकिशोर कागलीवाल, सतीश कागलीवाल, आकाश कागलीवाल यांची उपस्थिती होती.
बादल म्हणाल्या की, राज्यात पैठणसह ३ मेगाफूडपार्क झाले आहेत. १०९ प्रकल्प राज्यात मंजूर केले आहेत. ५३ कोल्ड स्टोरेज, १८ अन्न प्रयोगशाळा, ८ मिनी फुडपार्क, २५ इतर युनिटस्चा त्यात समावेश आहे. इतर देशांत ८० टक्के अन्न प्रक्रिया केले जाते. भारतात ते प्रमाण कमी आहे. कारण इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहे. त्यासाठी फूडपार्क ही संकल्पना ग्राऊंडपर्यंत राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागील सरकारने ४२ पार्क मंजूर केले; परंतु दोन पार्कच पूर्णत्वाकडे नेले. या सरकारच्या काळात ३० पार्क पूर्णत्वाकडे जातील, असा दावा करून त्या म्हणाल्या की, कोल्ड स्टोरेजसाठी साखळी योजना राबविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ७० हजार स्टोरेजची गरज असून, १० हजार उपलब्ध आहेत. भारताबाहेरील देशात ७० टक्के अन्न स्टोरेजमध्ये ठेवले जाते. भारतात ते प्रमाण ४ टक्के आहे. हे प्रमाण वाढण्यासाठी कृषी संपदा योजनेतून ६ हजार कोटींची तरतूद केली आहे. फूडपार्कसाठी ५० कोटींपर्यंतचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यात कोल्ड स्टोरेजसाठी १० कोटींची तरतूद असेल. १० एकर जागेत ५ युनिट लावले, तर त्यासाठी ३५ कोटींची सबसिडी दिली जाईल. खा. खैरे यांनी शेंद्रा, बिडकीन ते वाळूज मेट्रोची मागणी केली. प्रास्ताविकात नंदकिशोर कागलीवाल यांनी पैठण मेगा फूडपार्कची संकल्पना विशद केली.
पंजाबचे नुकसान काँग्रेसमुळेपंजाबचे नुकसान काँग्रेसमुळे होत असल्याचा आरोप बादल यांनी पत्रकार परिषदेत केला. त्या म्हणाल्या की, काँगे्रस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी निवडणुकीत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन पाळले नाही. पंजाबमधील ६०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. ४०० तरुण ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे दगावले आहेत. पंजाबमधील आतंकवाद ही काँग्रेसची देण आहे, असा आरोपही त्यांनी केला.
बिडकीनमध्ये लवकरच अँकर प्रकल्पशेंद्रा डीएमआयसीअंतर्गत बिडकीन इंडस्ट्रियलपार्कमध्ये लवकरच भारतातील नावाजलेल्या उद्योगांपैकी एक असा अँकर प्रकल्प येईल. असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. डिफेन्स झोन येथे तयार करण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यासाठी १० उद्योजक पुढे आले आहेत, तसेच मराठवाड्यात टेक्स्टाईलपार्क वस्त्रोद्योगासाठी सुरू करण्याचा प्रयत्न आहे.येथील कापूस उत्पादनामुळे टेक्स्टाईलपार्कमुळे चालना मिळेल. केंद्र शासनाने राज्यासाठी मंजूर केलेले ८ मिनी फूडपार्क पूर्ण करण्याचे काम गतीने पूर्ण करण्याचा दावा त्यांनी केला.