औरंगाबाद : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळावे, म्हणून आता साहित्य महामंडळाकडे नाशिक येथील लोकहितवादी मंडळाने निमंत्रण पाठविले आहे.
या निमंत्रणासह आता साहित्य महामंडळाकडे एकूण ४ ठिकाणची निमंत्रणे आली असून कोणाची वर्णी लागणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे. कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन पद्धतीने साहित्य संमेलन घेणार नाही, अशी भूमिका अ. भा. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच मांडली होती. त्यामुळे साहित्य संमेलन होणार तर कुठे आणि कसे याची चर्चा सध्या साहित्य वर्तुळात रंगलेली आहे.यापूर्वी पुणे, अंमळनेर आणि नाशिक येथील अन्य एका संस्थेकडून निमंत्रण आलेले आहे. त्यातच नुकतेच नाशिकच्या लोकहितवादी मंडळाकडूनही निमंत्रण मिळाले आहे. ३ जानेवारी रोजी मराठवाडा साहित्य परिषद येथे साहित्य महामंडळाच्या सदस्यांची बैठक होणार असून या बैठकीत ९४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या स्थान निश्चितीसाठी चर्चा होणार आहे.
लोकहितवादी मंडळ ही संस्था कविवर्य कुसुमाग्रज यांच्या संकल्पनेतून १९५० साली स्थापन झाली असून नाशिक परिसरात सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य व कला विषयक काम करीत आहे. संस्थेचे विश्वस्त हेमंत टकले, अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, सचिव सुभाष पाटील, कार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी हे निमंत्रण कार्यवाह दादा गोरे यांच्याकडे दिले आहे.