औरंगाबाद ः डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत २१ आणि २२ फेब्रुवारीला होत असलेल्या पश्चिम विभागीय कुलगुरू परीषदेचे निमंत्रण दिले. तसेच नामांतर शहिद स्मारक आणि साैर उर्जा प्रकल्पासाठी निधी आणि सवलत देण्याची मागणी कुलगुरूंनी केली.
असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज अर्थात 'एआययु' यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेचे यजमानपद दिले आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हे मुख्य संयोजक असून येत्या २१ व २२ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या परिषदेत महाराष्ट्र, राजस्थान व गोवा या राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू, प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी कुलगुरूंनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निमंत्रण दिले. त्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.
अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत अंतर्गत विद्यापीठ परिसरात सौर ऊर्जा प्रकल्प साकारण्यात येणार असून या प्रकल्पास राज्य शासनाने निधी व सवलत द्यावा. तसेच विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ साकार होत असलेल्या नामांतर शहीद स्मारकास राज्य शासनाने भरीव आर्थिक निधी द्यावा, असा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांचीही उपस्थिती होती.