औरंगाबाद : विदेशात सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट सामन्यावर सट्टा चालविणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी शनिवारी रात्री पर्दाफाश केल्यानंतर या सट्टेबाजाराच्या उलाढालीवर लक्ष केंद्रित केले. यात रोज सरासरी दीड ते दोन कोटींची उलाढाल होत असल्याचे सूत्राने सांगितले.औरंगाबाद शहरात आयपीएलवर सट्टा चालविला जात असल्याची माहिती मिळताच जिन्सी पोलिसांनी शनिवारी रात्री ऑनलाईन सट्टा खेळणाऱ्या गणेश कचरू व्यवहारेला पकडले. त्याने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली.
ऑनलाईन सट्टा मनोज दगडा हा चालवत असल्याचे समोर आले. अत्यंत गोपनीयता बाळगून आणि कागदावर त्याचे नाव येणार नाही याची तो खबरदारी घेतो. त्याच्याकडे सट्टा लावणाऱ्यांकडून तो ऑनलाईन पेटीएमसह अन्य व्हॉलेटचा वापर करून आणि ऑफलाईन एजंटामार्फत पैसे गोळा करून घेतो. मात्र, हे करताना सावधगिरी बाळगतो. तो एक रुपयाही स्वतः च्या खात्यावर अथवा थेट घेत नाही. त्यामुळे तो आतापर्यंत पोलिसांच्या जाळ्यात आलेला नव्हता. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याने व्यवहारेच्या व्हॉटसॲपवर स्वतःच्या मोबाईलवरून सट्ट्याचे भाव पाठवले आणि तो पोलिसांच्या कचाट्यात आला. व्यवहारेच्या अटकेचे वृत्त कळताच तो भूमिगत झाला.
शहरात आयपीएलवर ऑनलाईन आणि ऑफलाईन सुमारे दोन हजार जण सट्टा खेळतात. सरासरी ५ हजार ते २ लाख रुपयांचा सट्टा लावतात. रोजच्या दोन सामन्यांवर सरासरी दोन कोटींचा सट्टा खेळला जात असल्याचे सूत्राने सांगितले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलची उपांत्य किंवा अंतिम फेरीची मॅच जसजशी जवळ येत जाईल, त्यावेळी सट्टाबाजार तेजीत असेल. अशावेळी अधिक लोक त्यामध्ये गुंतलेले असतात. त्यावेळी पोलीस शहरातील विशिष्ट ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवून असणार आहेत. शहरातील काही बड्या व्यावसायिकांचाही यामध्ये सहभाग असण्याची शक्यता गृहीत धरून पोलीस तपास सुरू आहे. यापूर्वीच्या गुन्ह्यात सट्ट्याच्या व्यवहारांमध्ये ज्यांचा सहभाग होता अशांवरही पोलिसांची नजर राहणार आहे.
करमाडमध्ये एका सट्टेबाजाला अटकआयपीएल क्रिकेट स्पर्धेवर सट्टा घेत असलेल्या बुकीला करमाड येथे पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारी दुपारी चार वाजता अटक केली. याप्रकरणी उपनिरीक्षक विवेक जाधव यांच्या फिर्यादीवरून करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल काकासाहेब उकर्डे (रा. करमाड), असे अटक केलेल्या बुकीचे नाव आहे. करमाड येथे एक जण काही जणांना पांढऱ्या रंगाच्या कागदी चिठ्ठ्या देऊन सट्टा लावत असल्याचे खबऱ्याने पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला कळवले. त्यानंतर पथकाने करमाड येथून संशयितास ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून २८ हजार ९६० रुपये रोख रक्कम, एमएच २० डीएफ ५४१२ नंबरची स्कूटर, एक मोबाईल व कागदी चिठ्ठ्या हस्तगत करण्यात आल्या. त्यानंतर राहुल उकर्डे याला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विवेक जाधव, पंकज रोहे, धनराज चव्हाण यांनी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस करीत आहेत.
कॉल डिटेल मागविलेआरोपी कुणाच्या संपर्कात होता ही माहिती मिळविण्यासाठी त्याच्या मोबाईल फोनचे कॉल डिटेल मागविण्यात आले आहे. शिवाय त्यांच्या व्हॉट्सॲपचा डिलिट डाटा रिकव्हर करण्यासाठी कलिनाच्या प्रयोगशाळेला मोबाईल तपासणीसाठी पाठविला जाणार आहे, अशी माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दत्ता शेळके यांनी दिली.
सट्टा नवा नाहीआयपीएलवरील सट्टा औरंगाबादकरांसाठी नवा नाही. सन २०१४ आणि २०१७ साली पोलिसांनी आयपीएलवरील सट्ट्याचा अनुक्रमे उस्मानपुरा आणि आरबीहिल येथील कार्यालयाचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी पोलिसांनी काहींना ताब्यात घेतले होते.