औरंगाबाद : सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळविणाऱ्या एकाला जिन्सी पोलिसांनी छापा मारून अटक केली. ही कारवाई शनिवारी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास जुना मोंढा भागात करण्यात आली. गणेश कचरू व्यवहारे (३५, रा. गल्ली क्र. ५, न्यू हनुमाननगर), असे अटक करण्यात आलेल्या मजुराचे नाव आहे.
गणेश याच्या ताब्यातून २४ हजार रुपयांची रोकड आणि दोन मोबाईल हस्तगत केले. तथापि, मुख्य सूत्रधार मनोज दगडा याच्यासह अन्य बुकींचा पोलीस शोध घेत आहेत. २९ सप्टेंबरपासून दुबईतील आबुधाबी येथे आयपीएल क्रिकेट मॅच सुरू आहे. या सामन्यावर मोबाईलच्या माध्यमातून सट्टा लावला जात असल्याची माहिती जिन्सी पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी जुना मोंढा परिसरात सापळा रचून गणेश व्यवहारे यास ताब्यात घेतले. तेव्हा गणेश, निसार व खान हे मोबाईलवर व्हॉटसअॅप तसेच कॉलद्वारे मनोज दगडा हा सट्ट्याचा भाव सांगत असे. त्यानुसार हे तिघे जण शहरातील नागरिकांकडून पैसे घेऊन मनोज दगडा याच्याकडे सट्टा लावत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी कुख्यात सट्टेबाज मनोज दगडा याच्यासह त्याचे हस्तक गणेश व्यवहारे, निसार आणि खान यांच्याविरुद्ध जिन्सी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. मनोज दगडा हा सट्टा जिंकल्यावर त्याच्या हस्तकांमार्फत पैसे पुरवत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यात आसीफ भाई, अमजत सेठ, साजीद, मामू, असे हस्तकदेखील मोबाईल आयडीद्वारे आयपीएलवर पैसे लावून सट्टा खेळवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, उपनिरीक्षक दत्ता शेळके, जमादार हारुण शेख, पोलीस नाईक संजय गावंडे, शिपाई सुनील जाधव, संतोष बमनावत, होमगार्ड शेख बासीत यांनी केली.
मनोज दगडाची बड्यांसोबत ऊठबसशहरातील सट्टेबाजांची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. त्यांच्यासोबत अनेक स्थानिक राजकीय पुढारी, उद्योजक, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत ऊठबस आहे. काही पोलीस अधिकाऱ्यांचाही त्याच्याशी संबंध आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध ठोस कारवाई करण्यात येत नसल्याची चर्चा आहे. २०१४ मध्ये तत्कालीन आर्थिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी मयत नरेश धमार्जी पोतलवाड, तसेच मनोज दगडा आणि दत्ता खडके यांना आयपीएल सट्टाप्रकरणी अटक केली होती. त्यानंतरही तो सट्ट्याच्या व्यवहारात सक्रियच होता. तरीही कालपर्यंत त्याच्याविरुद्ध पोलिसांकडून कारवाई झाली नव्हती.