माझी वसुंधरा अभियान व केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत खाम नदीचे पुनरुज्जीवन केले जात आहे. त्यासाठी महापालिकेच्या प्रशासकांनी पुढाकार घेतला असून, छावणी परिषद, व्हेरॉक आणि इकोसत्त्व या संस्था महापालिकेला मदत करीत आहेत. पहिल्या टप्प्यात नदीपात्रात अनेक वर्षांपासून साचलेला कचरा उचलण्यात आला, तसेच वृक्षारोपण करण्यात आले. नदीपात्रात नागरिकांनी कचरा टाकू नये यासाठी खाम नदीवर व नदीला मिळणाऱ्या नाल्यांच्या ३० पुलांवर लोखंडी जाळ्या बसविल्या जात आहेत. यापूर्वी जाफरगेट नाल्यावरील पुलावर जाळ्या लावण्यात आल्या आहेत. गुरुवारी गरमपाणी पुलावर जाळ्या बसविण्यात आल्या. यावेळी उद्यान अधीक्षक विजय पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे, उद्यान विभाग अभियंता जी. बी. चांडक यांच्यासह परिसरातील मुलांची उपस्थिती होती. मनपा प्रशासकांनी नमूद केले की, खाम नदीचे पुनरुज्जीवन हा केवळ यांत्रिक किंवा तांत्रिक प्रकल्प नाही. शहरातील प्रत्येकाच्या जीवनाशी याचा संबंध आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून खाम नदीकाठावर राहणाऱ्या मुलांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचावण्याची इच्छा आहे.
गरमपाणी पुलावर लोखंडी जाळ्या बसविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:03 AM