लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्याच्या सिंचन अनुशेषातील कामे जलसंपदा व जलसंधारण विभागामार्फत करण्याचे वर्गीकरण करून त्याचा सुधारित आराखडा राज्यपालांकडून मंजूर झाल्याचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे.हिंगोली जिल्ह्याच्या सिंचन अनुशेषाचा प्रश्न आ. तानाजी मुटकुळे यांनी लावून धरला होता. काही दिवसांपूर्वी त्याला तत्वत: मान्यता मिळाली होती. मात्र त्यानंतर यात कोणती कामे होणार, कोणत्या बाबींसाठी सर्वेक्षण होणार, याबाबत संभ्रमावस्था होती. अनुशेषातील कामांचा मसुदा सादर करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले होते. त्यानंतर आराखडा सादर झाला होता. त्यातही काही सुधारणा सुचविल्या होत्या. आता सुधारित व अंतिम आराखडा मंजुरीत आहे. यात प्राधान्यक्रमाची व दीर्घकालीन उपाययोजनांचे असे दोन टप्पे केले आहेत. शिवाय इतरही कामांचा यात समावेश केला आहे. या आराखड्यात प्राधान्याने पूर्ण करावयाच्या कामांमध्ये वसमत तालुक्यातील सावंगी कोल्हापुरी बंधारा, प्रशासकीय मान्यता असलेला हिंगोली तालुक्यातील घोटा व सेनगाव बंधारा, प्रशासकीय मान्यतेस सादर हिंगोली तालुक्यातील ब्रह्मपुरी, गिलोरी, सेनगाव तालुक्यातील जांभरुण, पाणीउपसा उपलब्धता प्रमाणपत्रांसाठी सादर योजनांत हिंगोलीत खरबी, हिंगोली, दुर्गधामणी, समगा, टाकळगव्हाण तर सर्वेक्षण करावयाच्या योजनांतील जयपूर, कोंडवाडा, सेनगाव, वरूड चक्रपान अशी १५ कोल्हापुरी बंधाºयांची कामे प्राधान्यक्रमात आहेत. यातून ८.६७ दलघमी पाणीसाठा व १३८६ हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते. यासाठी २४.४८ कोटी लागतील. २0१७ ते २0२१ दरम्यान ही कामे पूर्ण करण्याचे आराखड्यात नियोजन आहे.
सिंचन अनुशेष; सुधारित आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 12:48 AM