माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (imtiaz jaleel) यांनी या विरोधात रस्त्यावर उतरून लढा देण्याचा इशारा दिला आहे. यावर आता, इम्तियाज जलील काय या शहराचा बादशाह आहे का? असे किती जरी आडवे आले, तरी त्यांना आडवे करण्याची ताकदही आम्ही ठेवणार. संभाजीनगर हे होणारच, असे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे, ते पत्रकारांशी बोलत होते.
इम्तियाज जलील काय बादशाह आहे का? -यावेळी, जलील म्हणाले, की औरंगाबादचे संभाजीनगर होऊ देणार नाही. त्यांनी काल बैठकही घेतली, असे विचारले असता शिरसाट म्हणाले, इम्तियाज जलील काय या शहराचा बादशाह आहे का? कोण इम्तियाज जलील? इथली जनता महत्वाची आहे आणि हा शिवसेना प्रमुखांचा शब्द आहे. संजय राऊतांसारखे खोटे नाही. संजय राऊत मागे म्हणाले होते, की प्रस्ताव गेला आहे. मग आता प्रस्ताव घ्यायची गरज काय पडली? असा सवालही शिरसाट यांनी यावेळी उपस्थित केला.
महिनाभरातच दिसून येईल अंमलबजावणी -शिरसाट म्हणाले, औरंगाबादचे संभाजीनगर करणे, हा उद्धव साहेबांनी घेतलेला निर्णय आहे. संभाजीनगर हे होणारच आणि तातडीने होणार. यासाठी केंद्राकडून मान्यता आणावी लागते. केवळ प्रस्ताव घेऊन नसतं होत. याला तातडीने मान्यता आणणार आणि असे किती जरी आडवे आलेना, तरी त्यांना आडवे करण्याची ताकदही आम्ही ठेवणार. संभाजीनगर हे होणारच. आमच्या मनात कसलेही दुमत नाही आणि आता ही घोषणा राहणार नाही. याची अंमलबजावणी तुम्हाला महिनाभरातच दिसून येईल.
राज्यात 20 जूनला झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर, एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास 40 आमदारांनी शिवसेनेत बंडाचा बिगूल वाजवला होता. शिंदे यांच्या बंडात औरंगाबाद जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह आ. संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, रमेश बोरनारे यांचाही सहभाग होता. सुरत, गुवाहाटी, गोवा यानंतर मुंबई आणि थेट सरकार, असा प्रवास करून शिंदे यांनी भाजपाच्या सहाय्याने नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर सोमवारी विश्वासमत जिंकल्यानंतर, आता बंडखोर आमदार आपापल्या मतदार संघात परतत आहेत. औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट बुधवारी आपल्या मतदारसंघात परतले आहेत.
शिंदेंच्या नेतृत्त्वातील हा उठाव शिवसेना वाचविण्यासाठी -आमदार संजय शिरसाट यांनी औरंगाबाद विमानतळावर येताच त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. मतदारसंघात कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. भरपावसात आमचे कार्यकर्ते आम्हाला नेण्यासाठी, स्वागतासाठी आल्याचे सांगत, त्यांनी आम्ही आजही शिवसैनिकच आहोत असे म्हटले आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील हा उठाव शिवसेना वाचविण्यासाठी होता, आम्हीच त्यांना हा बंड करायला लावले, असेही ते म्हणाले.