छत्रपती संभाजीनगर : माजी नगरसेवक व सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत असलेले राजू शिंदे हे पुन्हा भाजपात परतणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शहरात होते. त्यानिमित्त माजी खा. रावसाहेब दानवे यांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले हाेते. तिथे शिंदे यांच्या प्रवेशाबाबत निर्णय घेण्यासाठी चर्चा झाल्याची भाजप गोटातून सांगण्यात येत आहे. मात्र, शिंदे यांच्या प्रवेशाला पक्षांतर्गत प्रचंड विरोध आहे. त्यातून पक्षात दोन गट पडले आहेत.
शिंदे यांना आजवर पक्षाने मनपात अनेक पदांवर संधी दिली. असे असताना त्यांनी पक्ष विरोधात जाऊन दोन वेळा विधानसभा निवडणुका लढल्या. तसेच लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात जाऊन इतर उमेदवारासाठी लॉबिंग करीत होते. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला. निवडणुकीत लाखभर मते घेतली. परंतु, त्यांचा पराभव झाला. तर पूर्व मतदारसंघात भाजप उमेदवाराविरोधात असलेल्या एमआयएमच्या उमेदवारासाठी त्यांनी परिश्रम घेतल्याचे जाहीर सभांमधून वारंवार बोलले गेले. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या प्रवेशाला विरोध होत असला तरी आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा पक्षाला फायदा होईल. त्यामुळे त्यांना पक्षात घ्यावे, यासाठी एक गट वरिष्ठांकडे पाठपुरावा करतो आहे.
पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतीलराजू शिंदे यांच्या प्रवेशाबाबत पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतील. शहरातील नेतेमंडळी, प्रदेशाध्यक्ष हे याबाबत ठरवतील. - शिरीष बाेराळकर, शहराध्यक्ष भाजप