औरंगाबाद : चीनमधील पाच ते दहा वयोगटातील लहान मुला-मुलींनी नुकतेच महागामीमध्ये शास्त्रीय नृत्याची सुंदर मैफल सादर केली. या मुलींच्या गुरू जिन शान शान चीनमधील बीजिंग शहरात शास्त्रीय नृत्य प्रशिक्षण संस्था चालवितात. ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी उलगडलेला हा प्रवास...
जिन बीजिंगमध्ये राहतात. वयाच्या सातव्या वर्षी त्यांचा पारंपरिक भारतीय नृत्याशी पहिला संबंध आला आणि आजीवन टिकेल असे प्रेमाचे नाते निर्माण झाले. त्या वयातही त्यांचे मन आणि शरीर शास्त्रीय नृत्याच्या भावमुद्रांकडे आकर्षित होत होते. आयुष्यभर या नृत्याच्या सहवासात आपण राहावे अशी मनीषा मनात उमटू लागली. भारताबद्दल मनात आपसूकच एक जिव्हाळा तयार झाला.शालेय शिक्षणानंतर मग त्यांनी पेकिंग विद्यापीठात हिंदी भाषा व भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केला; परंतु नृत्य शिकायचे तर भारतात जावेच लागले हे मनाशी पक्के केले होते. तशी संधी १९९५ साली चालून आली. शिष्यवृत्तीच्या जोरावर हिंदी शिकण्यासाठी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. तसेच पं. बिरजू महाराजांकडे कथ्थकचेही प्रशिक्षण सुरू केले. मन मात्र भरतनाट्यमकडे घेऊन जात होते.
‘मला लीला सॅमसन यांच्याकडे भरतनाट्यम शिकायचे होते. त्यांना कित्येक वेळा विनंती करूनही ते शक्य झाले नाही. विदेशी विद्यार्थी शास्त्रीय नृत्याकडे केवळ एक आवड म्हणून पाहतात. त्यांच्यामध्ये संपूर्ण समर्पणाची वृत्ती नसते असा त्यांचा अनुभव असावा,’ असे जिन यांनी सांगितले. १९९६ साली त्या चीनला परत गेल्या. तेथे एका जपानी कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी लागली; पण काही केल्या मनातून भरतनाट्यम जात नव्हते. त्यांनी गुरू लीला यांच्याकडे सर्व सोडून शिष्य होण्याची इच्छा व्यक्ती केली. यावेळी जिन यांची दृढता पाहून लीला सॅमसन यांनी होकार दिला. जिन नोकरी सोडून भारतात दाखल झाल्या. ‘ईशा’ असे त्यांचे भारतीय नामकरणसुद्धा झाले.
सॅमसन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केवळ एकाच वर्षात अरंगेतरम सादर केले. ‘माझ्या आयुष्यभराचे स्वप्न मी जगत होते,’ असे जिन म्हणाल्या. पुढे लग्न आणि मुलीच्या जन्मानंतर दोन-तीन वर्षे खंड पडला. २००३ पासून मुलीला घेऊन भारतवारी करू लागल्या. मुलगी पाच वर्षांची झाल्यावर तिच्या मैत्रिणींच्या पालकांनी जिन यांना सर्व मुलींना शास्त्रीय नृत्य शिकविण्याची विनंती केली. त्यातून बीजिंगमध्ये २००५ साली सुरू झाले ‘संगीतम इंडियन आर्टस्’ हे शास्त्रीय नृृत्य प्रशिक्षण केंद्र.
‘मी चीनमध्ये परतल्यावर मला खूप एकटे वाटायचे. मी ज्या कलेमध्ये स्वत:ला शोधत होते त्या कलेप्रती माझे लोक अनभिज्ञ होते. माझी आवड कोणाशी शेअर करावी असे वाटायचे. त्यामुळे लहान मुलांना शिकवून मी माझ्यासाठी साथीदार निर्माण करत आहे. त्याच बहाण्याने मुलांचे पालक आमचे प्रेक्षक होत आहेत. आता चांगल्या प्रकारे शास्त्रीय नृत्याचे वातावरण तिकडे तयार झाले आहे, असे जिन म्हणाल्या. सध्या त्यांच्याकडे शंभर मुली शिकत आहेत. चीनमध्ये भारतीय कलेचे बीज रोवून संगोपन करणार्या जिन सर्वांसाठीच प्रेरणादायी आहेत.