लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्याबाबत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने अधिसूचना लवकरात लवकरात काढावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांना कळविले आहे.
औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामकरण करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. नामांतराच्या या मुद्यावरून भाजपने शिवसेनेवर आरोप केले आहेत. आता औरंगाबाद विमानतळाच्या नामांतराचा मुद्दा पुढे करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला कोंडीत पकडले आहे. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरदीप पुरी यांना स्मरणपत्र पाठविले आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णयया पत्रात म्हटले आहे की, या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. याचा ठराव विधिमंडळाच्या अधिवेशनातही दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला आहे. मुख्य सचिव यांच्या स्तरावरूनही केंद्रीय मंत्रालयाशी याबाबत पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याबाबतची अधिसूचना लवकरात लवकर निर्गमित करण्यात यावी.
परस्पर नामांतर करू नका; थोरातांनी सुनावलेमुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हॅंडलवर औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’ असा केल्याने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माहिती व जनसंपर्क विभागाला चांगलेच सुनावले आहे. महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, शहारांचे नामांतर हा आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही, असे थोरात यांनी ट्विटरवर म्हटले आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो की, सामाजिक सलोखा टिकण्यासाठी शहराच्या नामांतराला आमचा ठाम विरोध आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
सीएमओ ट्विटर हॅन्डलवर संभाजीनगर असा उल्लेखमुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. औरंगाबाद हे नाव त्यात कंसात देण्यात आले आहे.