- संजय जाधवपैठण : तालुक्यातील रजापूर येथील एका क्लिनिकमध्ये रोज एक वानर यायचे, तास, दीड तास बेडवर आराम करून निघून जायचे. यादरम्यान त्याने कुणालाही त्रास दिला नाही. बेडवर झोपलेल्या इतर रुग्णांना त्रास होईल, असे कोणतेही कृत्य केले नाही. गेले पंधरा दिवस हा सिलसिला सुरू होता. मात्र, शनिवारी सकाळी ते वानर डॉक्टरांच्या घरात घुसले, तेथून काही निघायचे नाव घेईना, शेवटी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह प्राणीमित्रांनी त्याला सोबत नेऊन वेरूळच्या जंगलात सोडले. मात्र, या पंधरा दिवसांत या वानराने सर्व ग्रामस्थांना लळा लावल्याने सर्वांनी त्याला जड अंतकरणाने निरोप दिला.
रजापूर येथे डॉ. प्रकाश गायकवाड यांचे संगीता क्लिनिक आहे. १५ दिवसांपूर्वी एका वानराने क्लिनिकमध्ये प्रवेश केला. तेव्हा रुग्ण घाबरून गेले. मात्र, वानर रुग्णांप्रमाणेच बेडवर झोपले. सलाईन संपल्यानंतर रुग्ण निघून जात होते, हे पाहून वानरही तासभराने तेथून निघून गेले. १५ दिवस सतत हे वानर बेडवर येत होते, यादरम्यान त्याने कुणालाच त्रास दिला नाही. तेथे आलेले पेशंट त्याच्या अंगावरून हात फिरवायचे. मुले त्याचे शेपूट पकडायचे, मात्र त्याने कोणालाही त्रास दिला नसल्याचे डॉ. प्रकाश गायकवाड यांनी सांगितले. मात्र शनिवारी सकाळी बेडवर झोपलेले वानर डॉ. गायकवाड यांच्या पाठीमागे थेट त्यांच्या घरात आले अन् त्याने घरातील सोफ्यावर ताणून दिली.
ते काही झोपेतून उठण्याचे नाव घेईना, यामुळे डॉ. गायकवाड यांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना फोन लावून माहिती दिली. वनपाल मनोज कांबळे यांनी तातडीने वनरक्षक राजू जाधव, प्रभू चोरमारे, प्रकाश सूर्यवंशी व आहिरे यांना रजापूरला पाठविले. वनरक्षक राजू जाधव यांना पाहताच सोफ्यावर आराम करत असलेले वानर खाडकन उठून बसले. राजू जाधव यांनी चल म्हणताच वानराने राजू जाधव यांना मिठी मारली व त्यांच्या खांद्यावर जाऊन बसले. राजू जाधव यांनी वनखात्याच्या जीपमध्ये बसण्यास वानरास सांगितले, तेव्हा ते जीपच्या पाठीमागील सीटवर जाऊन बसले. शनिवारी सायंकाळी या वानरास वेरूळच्या जंगलात सोडण्यात आले, असे वनरक्षक राजू जाधव यांनी सांगितले. या वानराचा सर्वांना लळा लागल्याने ते गावातून जाऊ नये, असे प्रत्येकाला वाटत होते.
मनुष्याचे अनुकरण करतात वानराच्या मेंदूचे आकारमान मोठे असते. तसेच त्यांच्या हाता-पायांची संचारक्षमता चांगली असते व त्यांची दृष्टीही तीक्ष्ण असते. या सर्व वैशिष्ट्यांमुळे वानरे क्रियाशील असतात आणि पुष्कळदा ती माणसांचे अनुकरण करतात.- राजू जाधव, वनरक्षक