औरंगाबाद : ‘म्युकरमायकोसिस’ झाला म्हणजे प्रत्येक रुग्णाचे डोळे काढावे लागतात, हा समज चुकीचा आहे. लवकर निदान झाले, तर डोळे काढण्याची वेळच येत नाही. घाटीतील तज्ज्ञांनी ३३ जणांचे डोळे वाचविले आहेत.
म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य जंतूमुळे होणाऱ्या आजाराचे घाटीत ९३ रुग्ण भरती आहेत. घाटीत आतापर्यंत ५५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. कान, नाक, घसा विभागप्रमुख डाॅ. सुनील देशमुख, डाॅ. वसंत पवार, डाॅ. महेंद्र कटरे, डाॅ. शैलेश निकम यांच्या पथकाने ५० एण्डोस्कोपिक सर्जरी केल्या आहेत. नेत्र विभागप्रमुख डाॅ. वर्षा नांदेडकर, नेत्रतज्ज्ञ व नोडल ऑफिसर डाॅ. शुभा घोणसीकर आणि पथकाने ३३ जणांचे डोळे आतापर्यंत वाचविले आहेत. ५ जणांमध्ये हा आजार जास्त पसरलेला होता. त्यांच्यावर अधिक विस्तृत शस्त्रक्रिया करण्यात आली. अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कान, नाक, घसातज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, औषधवैद्यकतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ रुग्णांसाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी साखरेचे प्रमाण आटोक्यात ठेवावे, स्वच्छ मास्क वापरावा, तसेच धुळीच्या ठिकाणी जाणे टाळणे आणि कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करता कामा नये, असे आवाहन घाटीतील तज्ज्ञांनी केले आहे.
आधी नाकाची शस्त्रक्रिया
ज्यांना म्युकरमायकोसिसचे लवकर निदान होते, त्यांची आधी नाकाची शस्त्रक्रिया केली जाते. जर डोळ्याभोवती बुरशी वाढणे सुरू झाले, तर त्या जागी इंजेक्शन दिले जाते. यातून डोळ्याचा संसर्ग आटोक्यात येण्यास मदत होते. काही रुग्णांमध्ये डोळ्याची नस आजारामुळे बंद झालेली आढळते. अशांमध्ये डोळे काढण्याची शस्त्रक्रिया करण्याची गरज नसते, असे घाटीतील तज्ज्ञांनी सांगितले.