औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशवे कालखंडात राज्यकारभाराची माहिती मोडीलिपीत असल्यामुळे त्या काळातील बहुतांश कागदपत्रे याच लिपीत उपलब्ध आहेत. शिवकालाचा अभ्यास करण्यासाठी मोडिलीपीचे ज्ञान आवश्यक आहे. त्याशिवाय हा कालखंड समजणे अशक्य असल्याचे प्रतिपादन मोडिलीपी तज्ज्ञ डॉ. कामाजी डक यांनी केले.
जागतिक वारसा सप्ताहाला सोमवारपासून (दि.१९) सुरूवात झाली आहे. यानिमित्ताने राज्य पुरातत्व विभागाच्या सोनेरी महल येथील कार्यालयात मोडिलीपीवर कार्यशाळा आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी कनिष्ठ अभियंता प्रकाश रोकडे होते. यावेळी तंत्रसहाय्यक निलिमा मार्कंडेय यांची प्रमुख उपस्थित होती. यावेळी पुरातत्व समन्वयक डॉ.कामाजी डक यांनी उपस्थिताना मोडीलिपीचे प्रशिक्षण दिले. मोडीलिपीची सुरुवात ही यादवकालखंडात झाली.
हेमाड पंडित यांनी मोडीलिपीची सुरुवात केली. शिवाजी महाराज आणि पेशव्यांच्या कालखंडात या लिपीचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. एवढेच नव्हे तर राज्यकारभारची लिपीच मोडी होती. यामुळे बहुतांश कागदपत्रे याच लिपीत उपलब्ध आहेत. मराठा इतिहास जाणून घेण्यासाठी मोडीलिपीचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचे डॉ. डक यांनी स्पष्ट केले. तसेच मोडीलिपीची बाराखडी, त्यातील बारकावे, कागदपत्रचे वाचन कशा प्रकारे करावे याविषयी माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
प्रस्ताविकात निलिमा मार्कंडेय म्हणाल्या, देशातील प्राचीन स्मारके, इमारती या देशाचा मौल्यवान खजिना आहेत. हा आपला सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत टिकविण्याची जबाबदरी देशातील प्रत्येक नागरिकाची आहे. प्राचीन शिलालेख, मंदिरे, मूर्तीशिल्प, गडकिल्ले, पुरातनस्थळे यांचे संरक्षण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षीय समारोप प्रकाश रोकडे यांनी केला. कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी नितीन चारुडे, एम. ए. पठाण, संजय चिट्टमवार, शालिनी प्रधान, मयुरेश खडके, स्नेहाली कुलकर्णी, दिलीप साळवे, चंद्रकांत जोशी, अरुण पेरकर, सविता वºहाडे, मिलिंद इंगळे, एकनाथ थोरात, मदनदास बैराळी, राजु माळी, ओजस बोरसे, विशाल जंगले, राहुल पल्ले, आकश बोकडे, सुनिल अगळे, मुरलीधर लोखंडे, मनोज बनकर यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेत ५० पेक्षा अधिक इतिहासप्रेमी सहभागी झाले होते.