औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील नियम ढाब्यावर बसविणाऱ्या मूठभर व्यापाऱ्यांनी व त्यांच्या समर्थकांनी कामगार उपायुक्तांना धमकावणे व कायदा सुव्यवस्था पायदळी तुडविणे अशोभनीय म्हटले पाहिजे, अशी टीका पालकमंत्री सुभाष देसाई यांनी कुणाचेही नाव न घेता स्वपक्षासह इतर पक्षातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांवर केली आहे.
पालकमंत्री देसाई यांनी कळविले आहे, जिल्ह्यातील २ लाख ९६ हजार ७५६ दुकाने व आस्थापनांपैकी ८२ आस्थापनांनी शासनाच्या निर्बंधांना झुगारून प्रतिबंधित कालावधीत आपली दुकाने उघडी ठेवली. ८२ पैकी ४६ प्रकरणाची सुनावणी घेऊन त्यांचे सील उघडण्यास प्रशासनाने मान्यता दिली. उर्वरित ३६ आस्थापनांची सुनावणी प्रलंबित आहे. त्यांच्यावर टाळेबंदीची कारवाई होणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे उर्वरित ९९ टक्क्यांहून अधिक नियम पाळणाऱ्या व्यापाऱ्यांप्रति आदर व्यक्त केला पाहिजे. वास्तविक सर्व ‘मान्यवरांनी’ नियम व कायदे पाळणाऱ्यांचा सन्मान करायचे सोडून कायद्याची पायमल्ली करणाऱ्यांची पाठराखण करावी, हे अनाकलनीय आहे.
सर्वांच्या सहकार्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या जिल्ह्यांमध्ये औरंगाबादला स्थान मिळाले. निर्बंध पाळणारे नागरिक व यंत्रणा राबविणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यामुळेच कोरोनाची लाट थोपविता आली आहे, असेही देसाई यांनी स्पष्ट केले आहे.