छत्रपती संभाजीनगर : टाइमपाससाठी, वेळ घालविण्यासाठी मोबाइल, संगणकावर विविध गेम्स खेळण्यात खूप जण गर्क असतात. मात्र, या गेम्सचे रूपांतर कधी व्यसनात होते, हे कळत नाही. त्यातूनच तासन्तास गेम्स खेळण्याने आरोग्यावर परिणाम होऊ लागतो. त्यामुळे वेळीच सावध होऊन गेम्सपासून लांब राहिलेले बरे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.
गेमिंग डिसऑर्डर म्हणजे काय?‘डब्ल्यूएचओ’ने काही वर्षांपूर्वी विविध आजारांविषयीची माहितीचे संकलन असणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील यादी जाहीर केली होती. ‘गेमिंग डिसऑर्डर’चाही समावेश होता. यात मोबाइलवरच सतत व्यग्र असणे. सुरुवातीला एक ते दोन तासांचा असलेला वापर नंतर १० ते १२ तासांवर जातो. एखाद्या वाईट व्यसनासारखी गेमिंगची सवय व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम करत असल्याचे यातून स्पष्ट झाले होते.
कारण काय?शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थी वेळ घालविण्यासाठी सुरुवातीला गेम्सकडे वळतात. मैदानी खेळाऐवजी घरातच राहून मोबाइल, संगणकावर गेम्स खेळण्यावर भर दिला जातो. यातूनच त्याचे रूपांतर व्यसनात होते.
लक्षणे काय?गेम खेळण्यासाठी मोबाइल, संगणकाचा अतिवापर, लोकांमध्ये कमी मिसळणे, झोप कमी होणे, अस्वस्थता, बेचैनी, उदासीनता, निराशा, सतत गेम्सचा विचार करणे, झोप, खाण्या-पिण्याच्या वेळा बदलणे इ. लक्षणे आहेत.
काय काळजी घ्याल?मनोविकारतज्ज्ञ डाॅ. आनंद काळे म्हणाले, इंटरनेट पूर्णपणे बंद न करता त्याचा योग्य व काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. दिवसभरात ज्यावेळी इंटरनेटचा अधिक वापर होतो, त्यावेळी दैनंदिन कामाचे वेळापत्रक ठरवावे. इंटरनेट वापराची मर्यादा ठरवून हळूहळू वापर कमी करावा. नेट वापरण्याची वेळी संपली, यासाठी अलार्म पद्धतही वापरता येते.
विविध गोष्टींवरगेमिंगला जीवनातील इतर आवडी आणि दैनंदिन क्रियाकलापांपेक्षा प्राधान्य दिले जाते. गेमिंग वर्तनाच्या पद्धतीमुळे वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक किंवा कामकाजाच्या इतर महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये लक्षणीय परिणाम जाणवतो.- डाॅ. मेराज कादरी, मनोविकारतज्ज्ञ