औरंगाबाद : राज्यात मंदिर खुले करण्यापेक्षा ‘ज्ञानमंदिर’ म्हणजे शाळा खुले करण्याची गरज आहे. घरात देव असतातच, तेथेही पूजापाठ करता येतात. याचा अर्थ भाजपच्या मंदिर खुले करण्याच्या आंदोलनाला माझा विरोध आहे असे नाही, असे स्पष्टीकरण देत शासनाने तातडीने शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा २३ ऑगस्टपासून शाळा, कोचिंग क्लास सुरू करण्याचा इशारा माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.
जिल्ह्यात सर्व अनलॉक असताना ज्ञानमंदिरे सुरू करण्यासाठी शासनाने ‘एसओपी’ (स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) तयार करावी. त्यानुसार परवानगी द्यावी. अन्यथा आम्ही स्वत: नियमावली तयार करून औरंगाबादसह राज्यातील सर्व शाळा, कोचिंग क्लास, महाविद्यालये कोरोना पार्श्वभूमीवरील सर्व नियम पाळून २३ ऑगस्टपासून सुरू करू, मग २० विद्यार्थी आले तरी शाळा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आ. बागडे म्हणाले, ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थी विचलित होत असून, ते शिक्षणापासून दूर जाण्याची भीती वाटते आहे. लेखीपरीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्यांच्यात नैराश्य येऊ शकते. पिढी बरबाद होऊ नये, यासाठी शाळा लवकर सुरू केल्या पाहिजेत. शिक्षण विभागाने १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता. परंतु मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सचे नाव पुढे करून तो निर्णय थांबविला.
बाजारपेठा, मॉल, हॉटेल्स, परमिटरूम्स बिनधास्त मोकळे केले आहेत. तेथे अनोळखी लोकं येतात. त्यांना कोरोना संसर्ग असला तरी ट्रेस करणे अवघड आहे. परंतु शाळेमध्ये येणारे विद्यार्थी ओळखीतले, शेजारचे, गल्लीतीलच असतात. विद्यार्थ्यांनी शाळेत एकत्र यायचे नाही आणि गल्लीत एकत्र खेळायचे हे काही सयुक्तिक वाटत नाही. शाळांनी पल्स मीटर, टेम्परेचर गन, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्स पाळल्यास सर्व काही सुरळीत चालेल. गरीब, झोपडपट्टी, ग्रामीण भागातील निरक्षर पालकांच्या पाल्यांचे नुकसान होत आहे. यावेळी भाजप संस्थाचालक आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजीव वाघ, प्रदेशाध्यक्ष प्रा. पांडुरंग मांडकीकर, डॉ. बाळासाहेब वाल्हेकर, ज्ञानेश्वर दळवी, योगेश्वर रोजेकर आदी उपस्थित होते.
चौकट...
किमान तीन तास तरी शाळा भरवा
गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयातील बारकावे ऑनलाइन समजू शकत नाहीत. त्यासाठी वर्ग भरणे गरजेचे आहे. या तीन विषयांसाठी तीन तास शाळा सुरू टप्प्याटप्प्याने सुरू करावी. ग्रामीण भागात जिल्हा परिषद, खासगी शाळा बंद आहेत. शहरात ऑनलाइन शाळा काही प्रमाणात सुरू आहेत. ग्रामीण विद्यार्थी व पालकांचे भागात प्रचंड हाल होत आहेत. शाळा व कोचिंग क्लास सुरू करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.
चौकट..
..त्यांचे वेतन सुरू आहे
शिक्षक संघटनांनी शाळा सुरू करण्यास विरोध केल्याच्या प्रश्नावर आ. बागडे म्हणाले, शाळा बंद काय आणि सुरू काय, शिक्षकांचे वेतन तर सुरू आहे. शिवाय शिक्षक संघटनेत सामान्य विद्यार्थ्याचा पालक असता तर कळले असते काय नुकसान होत आहे. निरक्षर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या मुलांच्या भविष्याचा विचार कुणी करणार की नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.