औरंगाबाद : शहराच्या इतिहासात प्रथमच महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या एमआयएम पक्षाने एप्रिल २०१५ मध्ये चमत्कार केला होता. पक्षाचे तब्बल २५ नगरसेवक निवडून आले. त्यात नगरसेवक सय्यद मतीन नेहमीच वादग्रस्त ठरले. पाणी प्रश्नावर महापौरांच्या अंगावर खुर्च्या भिरकावणे, राजदंड पळवून नेणे, वंदेमातरम् गीताचा अवमान करणे, महापालिकेच्या प्रवेशद्वारावर अनधिकृतपणे उर्दूत बोर्ड लावणे, आदी अनेक वादग्रस्त कामांमुळे त्यांच्यावर वेळोवेळी कारवाईसुद्धा करण्यात आली आहे. त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, असा प्रस्ताव मागील एक वर्षापासून शासनाकडे पडून आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये औरंगाबादेत एमआयएम पक्षाची अक्षरश: लाट आली होती. या लाटेत मध्य विधानसभा मतदारसंघातून इम्तियाज जलील निवडून आले. त्याच्या पुढच्याच वर्षी मनपाच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. सर्वत्र काँग्रेसविरोधी लाट असताना महापालिकेतही एमआयएमची जादू कायम होती. पहिलीच निवडणूक लढविणाऱ्या या पक्षाला २५ नगरसेवक मिळाले. औरंगाबादकरांनी मोठ्या उमेदीने आपल्या हक्काचे प्रतिनिधी महापालिकेच्या सभागृहात पाठविले होते. अल्पावधीत औरंगाबादकरांची घोर निराशा झाली. महापालिकेत एमआयएम नगरसेवक वेगवेगळ्या कारणांवरून वादग्रस्त ठरू लागले.
१७ आॅगस्ट रोजी महापालिकेची नियमित सर्वसाधारण सभा सुरू असताना एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन बसलेले होते. वंदेमातरम्चा अवमान केल्याबद्दल त्यांच्यावर २४ आॅगस्ट रोजी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणात सिटीचौक पोलिसांनी मतीन यांना अटक केली नव्हती. राजाबाजार भागात दंगल उसळल्यानंतर अटक केली होती.
१६ आॅक्टोबर २०१७ रोजी तत्कालीन महापौर बापू घडमोडे यांची शेवटची सभा होती. सभेत पाणी प्रश्नावरून नगरसेवक आक्रमक झाले होते. नगरसेवक मतीन, शेख जफर यांनी राजदंड पळविला. यावेळी सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की करण्यात आली. महापौरांच्या अंगावर खुर्च्याही त्यांनीच भिरकावल्या होत्या. या प्रकरणातही सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदवून गोंधळी नगरसेवकांचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला. शासनाने त्यावर निर्णय घेतला नाही.अलीकडेच मतीन यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर उर्दूत बोर्ड आणून परस्पर लावला होता. मनपा प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नाही. फक्त बोर्ड काढून घेतला होता.
यानंतर, शुक्रवारी (दि.१७ ) सय्यद मतीन यांनी महानगरपालिकेच्या विशेष सभेत माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली ठरावास विरोध करत वादग्रस्त व्यक्तव्य केले. यामुळे सभागृहात अभूपूर्व गोंधळ होत भाजप सदस्यांनी मतीन यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी आज सकाळी सभागृहात गोंधळ केल्याच्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच मतीन यांनीसुद्धा भाजप नगरसेवकांवरही तक्रार दाखल केली आहे.