औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) पॅथॉलॉजी विभागामध्ये ‘सिंगल डोनर प्लेटलेट्स’ची सुविधा उपलब्ध होत आहे. या सुविधेमुळेच कमीत कमी बॅगांमध्ये रुग्णांची प्लेटलेट्सची मोठी गरज पूर्ण होऊ शकणार आहे. रक्तदात्याकडून फक्त प्लेटलेट्स घेणेही शक्य होणार आहे.
यासाठी लागणारे यंत्र नुकतेच विभागात उपलब्ध झाले आहे. रक्त घटकांच्या आणखी सुविधाही विभागामध्ये उपलब्ध होत आहेत. लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद मिडटाऊन व मिडटाऊन लायन्स मेडिकल सर्व्हिसेस ट्रस्टने पॅथॉलॉजी विभागाला देणगी स्वरुपात दिलेल्या ९० लाखांच्या उपकरणे व साहित्याच्या माध्यमातून या सुविधा होत आहे. घाटीत नुकत्याच झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात ‘मिडटाऊन’तर्फे पॅथॉलॉजी विभागाला ही उपकरणे, साहित्य देण्यात आले.
‘इंटरनॅशनल लायन्स’चे संचालक डॉ. नवल मालू, विजयकुमार राजू, डॉ. हिमांशू गुप्ता, डॉ. भारुका, महेश पटेल, भूषण जैन आदींच्या पुढाकारातून व घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या समन्वयातून ९० लाखांची उपकरणे व साहित्य घाटीला देण्यात आले. देणगीमध्ये १२ प्रमुख उपकरणांचा समावेश आहेत. यात अफेरेसिस मशीन, डोनर कोच, एलायझा रिडर, ब्लड स्टोअरेज कॅबिनेट यासह विविध महत्वाची उपकरणे व साहित्याचा समावेश आहे.
रक्त पुन्हा शरिरातअफेरेसिस हे यंत्र घाटीमध्ये पहिल्यांदाच उपलब्ध झाले आहे. याद्वारे आता ‘सिंगल डोनर प्लेटलेट्स’ची सुविधा उपलब्ध होणार आहे. यात रक्तदात्याच्या शरीरातील रक्तामधून केवळ प्लेटलेट्स वेगळ्या काढल्या जाऊन त्या बॅगमध्ये जमा होतील आणि वेगळे झालेले रक्त पुन्हा त्याच रक्तदात्याच्या शरीरामध्ये सोडले जाईल, असे विभागप्रमुख डॉ. अनिल जोशी यांनी सांगितले.