छत्रपती संभाजीनगर : गुरूवारी पहाटेच शहरातील बड्या बांधकाम व्यवसायिकांच्या घरांसह कार्यालयांवर आयटीने छापे टाकले. यात जवळपास पाच मुख्य बांधकाम व्यवसायिकांसह त्यांच्याशी संबंधित गुंतवणूकदार व अन्य प्रायोजकांचीही यात चौकशी सुरू असल्याचे वरीष्ठ सुत्रांनी सांगितले. महिन्याभरातच शहरात दुसऱ्यांदा आयटीच्या कारवाईमुळे उद्योजकांसह बाजारेपठेत खुमासदार चर्चांना पेव फुटले होते.
वरीष्ठसुत्रांच्या मते, राज्यभरातील विविध ठिकाणच्या मुख्य कार्यालयातून आयटीचे जवळपास २०० पेक्षाअधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकासाठी या छाप्यांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये शहरातील बांधकाम क्षेत्रात मोठ्या गुंतवणूक झाल्या. पैठण रोड, सातारा, देवळाई, शेंद्रासह शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये मोठ्या प्रकल्पांना सुरूवात झाली. यात अब्जो रुपयांची गुंतवणूक झाल्याचे क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर सर्व प्रकल्पांमधील व्यवहार तपासण्यासाठी, काही अनियमिततेच्या संशयावरुन ही छापेमारी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्य पाच व संबंधितांचे कार्यालयमुंबई व राज्यातील आयटी विभागाच्या अन्य कार्यलायातून पहाटे साडेपाच वाजताच पथकांनी कारवाईस प्रारंभ केला. सुरूवातीला निवासस्थानांसह मुख्य कार्यालयांकडे पथकांनी कुच केली. सकाळी १० वाजेनंतर काही बांधकाम व्यवसायिकांच्या पूर्ण झालेल्या, पूर्णत्वास येत असलेल्या व त्याशिवाय ग्राहकांनी ताबा घेतलेल्या प्रकल्पांमध्ये देखील ही पथके गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. गुरूवारी दुपारपर्यंत मात्र आयटीकडून यासंदर्भात कुठलीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नव्हती.