औरंगाबाद : तब्बल वीस दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाच्या खंडानंतर जोमातून कोमात गेलेल्या पिकांना मोठा आधार मिळाला आहे. त्यामुळे पिके आयुसीयुतून आता जनरल वॉर्डात दाखल झाली आहेत. मात्र, उत्पादनात मोठी घट होणार आहे. हलक्या जमिनीतील पिकांनी अगोदरच माना टाकून रामराम केला. त्यामुळे कोसळला तर खरा, पण थोडा उशीरच झाला. आठ दहा दिवसांपूर्वीच कोसळला असता, तर पिकांना तडाखा बसला नसता, असे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.
पैठण तालुक्यात पाच महसुली मंडलात अतिवृष्टी
पैठण : तालुक्यात सोमवारी पाच महसूल मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली. तालुक्यात धो-धो बरसल्याने महत्त्वाच्या नद्या, नाले व ओढ्यांना पूर आला. वीरभद्रा नदीला आलेल्या महापुराने गेल्या २४ तासांपासून नांदर गावाचा संपर्क तुटला आहे. शेतशिवारात व उभ्या पिकांत पाणीच पाणी साचले आहे.
सोमवारी दुपारनंतर तालुक्यात पावसाला प्रारंभ झाला. बालानगर, आडूळ, पाचोड, विहामांडवा व नांदर महसूल मंडलात अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील वीरभ्रदा या प्रमुख नदीला महापूर आला होता. यामुळे नांदर या मोठ्या गावाचा संपर्क मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत तुटला होता. तसेच अनेक गावातील रस्ते पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटले होते. काहींच्या उभ्या पिकात पाणी साचल्याने पिकांचे नुकसानही झाले आहे.
मंडलनिहाय सोमवारी झालेला पाऊस
पैठण २५ मि.मी., पिंपळवाडी पिराची ३८ मि.मी., बिडकीन १० मि.मी., ढोरकीन ४४ मि.मी., बालानगर ८५ मि.मी.,
नांदर ८१ मि.मी., आडूळ ६६ मि.मी., पाचोड ७५ मि.मी., लोहगाव १५ मि.मी., विहामांडवा ९३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात आजपर्यंत एकूण पाऊस ३९६४ मि.मी. झाला असल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले.
फोटो :