बापू साेळुंके औरंगाबाद : ट्युलिप, गुलजरा या फुलझाडांची कलमे असल्याचे सांगून शहरातील विविध रस्त्यांवर रोपे विक्रीला आलेली आहेत. लागवडीनंतर या रोपांना रंगीत फुले येतात, असे विक्रेते सांगत आहेत. विशेष म्हणजे कोणत्या रंगाचे फुले येतील हे सांगण्यासाठी रोपांच्या कलमांनाच विविध रंग लावण्यात आले. रोपे कोणत्या प्रकारची आहे, हे कळू नये, अशी रोपांची पाने छाटण्यात आल्याचे दिसून येते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध रस्त्यांवर टोपलीभर हिरवीगार कलमे विक्रीसाठी आलेली आहे. ५० रुपयांना एक आणि १०० रुपयांत तीन कलमे या दराने ही विक्री होत आहे. रोपे विकणाऱ्याच्या एका हातात कलम तर दुसऱ्या हातात ट्युलिप नर्सरीचे छायाचित्र आहे. ही छायाचित्रे दाखवून ही रोपे ट्युलिपची असून रोप लावल्यानंतर १५ दिवसांत फुले येतात. शिवाय वर्षभर फुले येत असतात, असे सांगितले जात आहे. गुलाबी, पिवळा, निळा आणि शुभ्र रंग या रोपांच्या शेंड्याजवळ लावलेला आहे. ज्या रंगाचे रोप त्या रंगाचे फुले येतील, असा दावा हे विक्रेते करतात. आकाशवाणीसमोर रोपे विक्री करणारी ललिता बेलदार (रा.एरंडोल, जि. जळगाव) यांना या रोपाविषयी विचारले असता, सुरुवातीला तिने ही ट्युलिपची रोपे असल्याचे सांगितले. तुम्ही कधी ट्युलिपची नर्सरी पाहिली का, असे विचारल्यानंतर तिने नकारार्थी उत्तर दिले. ती पतीसह अन्य सुमारे ४० ते ५० लोक ही रोपे विक्री करण्यासाठी शहरात आल्याचे तिने सांगितले. ही कलमे सुरत येथील ठेकेदार त्यांना आणून देतो, असेही तिने सांगितले. पंधरा दिवसांत फुले येतील असे, ठेकेदारांनी सांगितल्याचे तिचे म्हणणे आहे.
ट्युलीप नव्हे ही तर इकॉर्निया जलपर्णीट्युलिप या फूलझाडाच्या नावाखाली शहरात इकॉर्निया ही जलपर्णी विक्री केली जात असल्याचे दिसून येते. ही जलपर्णी फक्त प्रदूषित पाण्यावर वाढते. नागरिकांनी ट्युलिप म्हणून खरेदी केलेले रोपटे फेकून देऊ नका. ती मुळासह नष्ट करा, अन्यथा ही जलपर्णी नदी-नाल्यात फेकून दिल्यास तिची झपाट्याने वाढ होते. शिवाय ती अपायकारक आहे.-डॉ. भारतभूषण पंडित, वनस्पतीशास्त्रज्ञ
शहरातील रस्त्यावर विक्री करण्यात येत असलेले हिच ती कथीच ट्युलीप कलमे व इन्सॅटमध्ये ट्युलीपची खरी चित्रे.