छत्रपती संभाजीनगर : लोकसभा न लढवण्याची चूक झाली, आता शहरातल्या तीन मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा असल्याचे जाहीर करीत शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख युसूफ यांनी वातावरण निर्मितीसाठी आता वार्डा-वार्डांतून संवाद बैठका घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
गांधी भवन, शहागंज येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. पूर्व, मध्य व पश्चिम विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सोडून घेण्यासाठी वरिष्ष्ठांकडे मागणी केली असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. येत्या २० सप्टेंबर रोजी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव कुणाल चौधरी व आ. इम्रानभाई खेडावाला हे आढावा बैठक घेण्यासाठी येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. जितेंद्र देहाडे, रोजगार, स्वयंरोजगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष योगेश मसलगे, अल्पसंख्याक विभागाचे मराठवाडा अध्यक्ष हमद चाऊस, प्रवक्ते डॉ. पवन डोंगरे, महिला शहर अध्यक्षा दीपाली मिसाळ, किसान काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र रमंडवाल, श्रीराम इंगळे, आकेफ रजवी, डॉ. अरुण शिरसाठ, प्रमोद सदाशिवे, युसूफ मुकाती, अयुब खान, डॉ. सरताज पठाण, अनिस पटेल, अथर शेख, अनिता भंडारी, विनायक सरवदे आदींनी सूचना मांडल्या. नीलेश अंबेवाडीकर, गौरव जैस्वाल, मोहित जाधव, युसूफ मुकाती, रवी लोखंडे, मंजू लोखंडे, मुददस्सीर अन्सारी, नायबराव दाभाडे, शीला मगरे आदींसह कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते.
ब्रॅण्डिंग करणं हा माझा हेतू नाही. शहरभर पोस्टर्स लावल्याने मला शेकडो फोन आले. काँग्रेसकडे लोक यायला तयार आहे. पण, आपण लोकांपर्यंत जात नाही, अशी खंत दीपाली मिसाळ यांनी व्यक्त केली. तर, हमद चाऊस यांनी, पोस्टर, बॅनर लावल्याने पक्ष वाढणार नसल्याची टिप्पणी केली.
बैठकीत करण्यात आलेल्या सूचना...-गांधी भवनात आता रोज बसायला सुरू करा-वार्डा-वार्डात बैठका घ्या, जनसंवाद यात्रा काढा-कागदोपत्री बूथ कमिट्या नको-३२ सेल आहेत, त्यांना कामाला लावा- बैठकांचा धडाका सुरू करा-केवळ तिकिटासाठी गांधी भवनात येऊ नका, पक्ष वाढीसाठी काम करा