वाळूज महानगर : लाईट गेल्यानंतर सॅनिटायझरच्या बॉटलजवळ पेटती मेणबत्ती ठेवून झोपी गेलेल्या तरुण घराला लागलेल्या आगीत गंभीर भाजल्याची घटना मंगळवार (दि.२२) सायंकाळी रांजणगावात घडली. आगीत होरपळलेल्या राम हरिश्चंद्र दिगे (२८ रा. रांजणगाव) याचा आज बुधवार (दि.२३) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. (Young man dies after blast hit by a sanitizer bottle )
याविषयी अधिक माहिती अशी की, राम हरिश्चंद्र दिगे (२८) हा आई-वडील व पत्नीसह रांजणगावातील भारतनगरात वास्तव्यास असून तो वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत काम करतो. काही दिवसापूर्वी राम दिगे याची पत्नी प्रसूतीसाठी माहेरी गेल्याने राम हा आई ज्योती दिघे व वडील हरिश्चंद्र दिघे यांच्या सोबत वास्तव्यास होता. मंगळवार (दि.२२) सायंकाळी राम दिघे हा घरातील वरच्या रुममध्ये झोपण्यासाठी गेला होता. दरम्यान, सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास राम झोपलेल्या खोलीतून धूर बाहेर येत असल्याचे शेजारी राहणाऱ्या किरण खांदेभराड यांच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखत खांदेभराड यांनी आरडा-ओरडा करुन दिगे यांच्या घराकडे धाव घेतली. यावेळी राम याचे आई-वडील, किरण खांदेभरात व गणेश सोळंके यांनी घराच्या वरच्या रुमजवळ जाऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा आतून बंद असल्याने तसेच धुराचे लोळही खिडकीतून बाहेर येत असल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी राम हा गादीवर भाजलेल्या अवस्थेत शेजारी व त्याच्या आई-वडिलांना दिसून आला. यानंतर नागरिकांनी घरातील आग विझवित राम यास पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना आज बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास राम दिगे याची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ वसंत जिवडे हे करीत आहेत.
पोलिसांनी नोंदविला जबाबया आगीत भाजलेल्या राम दिगे याने पोलिसांना दिलेल्या जबाबात मंगळवारी सायंकाळी लाईट गेल्यामुळे आपण मेणबत्ती पेटवून घरात झोपी गेलो होतो. या मेणबत्तीजवळ सॅनिटायझरची बॉटल असल्याने मेणबत्ती जळत असताना सॅनिटायझरच्या बॉटलला मेणबत्तीच्या ज्वालामुळे आग लागून भडका उडाल्याने आपण भाजल्याचे पोलिसांना सांगितले. तत्पूर्वी मेणबत्ती गादीवर पडल्याने आग लागून घरात मोठा धूर झाला होता. यावेळी गादीवर गाढ झोपेत असलेला राम हा आगीच्या चपाट्यात सापडून भाजला गेला. घरात लाईट नसल्याने तसेच धुरामुळे त्याचा श्वास कोंडल्यामुळे दरवाजा उघडता आला नसल्याचे राम दिगे याने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले.