छत्रपती संभाजीनगर - प्राध्यापकांच्या तक्रारीची दखल न घेता उलट त्यांचा भर वर्गात संस्थाचालकांची तळी उचलून झापणाऱ्या प्रशासन अधिकाऱ्यांना उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसवर दोन दिवसात स्पष्टीकरण देण्याचे आदेशही संचालकांनी दिले आहेत.
उच्च शिक्षणच्या विभागीय कार्यालयातील प्रशासन अधिकारी वनिता सांजेकर यांना संचालक डॉ. देवळाणकर यांनी दिलेल्या नोटिसीनुसार धाराशिव जिल्ह्यातील लोहारा येथील भारतीय राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सचिवांनी शंकरराव पाटील महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचाऱ्यांचे बनावट सेवापुस्तक तयार करीत असल्याची तक्रार केली. याबाबत संस्थेशी काहीही विचारणा केली नसल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्याशिवाय धाराशिव जिल्ह्यातील माकणी येथील महाविद्यालयात चौकशीसाठी गेल्यानंतर त्याठिकाणी प्राध्यापकांना आरेरावी, धमकी देण्याची भाषा वापरली. त्याठिकाणी प्राध्यापकाला मारहाणीची चौकशी न करता त्यांनाच झापण्यात आले होते. याविषयी बामुक्टो संघटनेने सहसंचालकांसह संचालकांकडे सांजेकर यांची ११ मे रोजी तक्रार केली होती. त्यानंतर २४ मे रोजी बामुक्टा संघटनेने प्राध्यापकांना उद्धट व अपमानास्पद बोलणे, कामासाठी पैशाची मागणी करणे, धमकावणे, प्राध्यापकांवर गंभीर आरोप करणे, वरिष्ठांच्या आदेशाची पायामल्ली करणे, वरिष्ठांच्या अधिकारात हस्तक्षेप करणे, पदाचा गैरवापर केल्याच्याही तक्रारी करण्यात आल्या होत्या.
या सर्व तक्रारीवरून डॉ. देवळाणकर यांनी विभागाची प्रतिमा मलीन होत असल्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम क्रमांक ३ चा भंग केल्याचे सकृती दर्शनी स्पष्ट होत आहे. त्यामुळे आपणावर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत खुलासा करण्याचे आदेश नोटिसीद्वारे देण्यात आले आहेत.