औरंगाबाद : महापुरुषांमुळेच समाजाला दिशा मिळाली, असे प्रतिपादन निवडणूक उपजिल्हाधिकारी भारत कदम यांनी शनिवारी येथे केले.
ते मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात गुरू रविदास, संत सेवालाल, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत गाडगेबाबा आणि माता रमाई यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे उद्घाटन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य रामदास वनारे होते. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
रात्र वैऱ्याची असल्यामुळे बहुजन समाजाने आता जागृत होण्याची गरज आहे व शिक्षणामुळे कायापालट होतो हे लक्षात घेऊन शिक्षणाची कास धरली पाहिजे, असे आवाहन कदम यांनी यावेळी केले. स्वागताध्यक्ष प्रा.डॉ. गोपाल बछिरे यांनी प्रास्ताविक केले.
जयश्री सोनकवडे यांचे भाषण झाले. रतिलाल कुचे व अनिल अंभोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मानवता सेवा संघ व गुरू रविदास जयंती केंद्रीय उत्सव महासंघाच्या वतीने या व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. दिवसभर चाललेल्या या व्याख्यानमालेत प्रा. श्याम सुडे यांचे रविदासांचे मानवतावादी व विज्ञानवादी विचार व कार्य या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी सुभाष बरोदे होते. संत रविदास, कबीर, तुकाराम महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची कूळ एकच होती, हे लक्षात घ्या, असे ते म्हणाले.
शिवाजी महाराजांचे बहुजन हितैषी कार्य या विषयावर प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी डी. टी. शिंपणे होते. प्राचार्य हिरालाल राठोड यांनी सेवालाल महाराजांचे अंधश्रद्धा विषयीचे विचार व कार्य या विषयाची मांडणी केली. अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉ. युवराज गहराव होते, तर गाडगेबाबा यांचे अंधश्रद्धा निर्मूलन व बहुजन जागृतीचे कार्य या विषयावर डॉ. संजय पाईकराव यांनी आपले विचार मांडले. अध्यक्षस्थानी डॉक्टर पी. आर. भगुरे होते. प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे यांनी ''माता रमाईंचा त्याग व संघर्ष'' या विषयावर सुरेख मांडणी केली. अध्यक्षस्थानी ॲड. सुखलाल पसरटे होते. रमेश डोंगरे, रमेश विठोरे, प्रमिला चिंचोले, गौराबाई जाटवे, कमल धामणे, राधा शिंगणे, प्रवीण बोराडे, मदन भगुरे, भगीरथ धामुणे, सीताराम पंढरे, आदींनी या व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.