चिंचोली लिंबाजी : ‘जेव्हा डोलीत घेऊन आले तेव्हा मला सांभाळता आले नाही. तेव्हा माझ्यावर अन्याय करत दुसरीला डोलीत घेऊन आले आणि आता परत प्रचारानिमित्त मी तालुक्यात फिरत असताना माझ्या पाठीमागे एक गाडी सतत फिरवून 'मेहंदी लगाके रखना, डोली सजा के रखना, लेने तुझे ओ गोरी आयेंगे तेरे सजना, हे गाणे वाजवत मला पुन्हा डोलीत बसवण्याचे स्वप्न बघताहेत, असा टोला कन्नड मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार संजना जाधव यांनी नाव न घेता अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना लगावला.
कन्नड विधानसभा मतदारसंघातील शिंदे सेनेच्या उमेदवार संजना जाधव यांनी शनिवारी रात्री चिंचोली लिंबाजी येथे प्रचारसभा घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी जाधव म्हणाल्या, मागील काही काळात माझ्यावर परिवारात झालेल्या अन्यायाची मी कधीच जाहीर वाच्यता केली नाही आणि भविष्यात कधी करणारही नाही. ती माझी संस्कृती नाही. मागील पंधरा वर्षांपासून कन्नड-सोयगाव तालुक्याचा विकास ठप्प झाला आहे. विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नाहीत. विकास हा एकमेव उद्देश घेऊन मी आजपर्यंत काम करीत आले आहे. यापुढेही करणार आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असून तुम्ही जर मला संधी दिली तर तालुक्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढेल, असे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, रावसाहेब पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव बनसोड आदी उपस्थित होते.