औरंगाबाद : येत्या हिवाळ्यापासून औरंगाबादेतून झूम एअरवेज आणि जेट एअरवेज या दोन कंपन्यांचे प्रत्येकी एक विमान सुरू होणे शक्य झाले आहे. दिल्लीहून औरंगाबादला विमान सुरू होईल. दिल्ली ते औरंगाबाद आणि बंगळुरू असे विमान हिवाळ्यात सुरू होईल. स्पाईस जेट, इंडिगो, जेटसारख्या कंपन्यांनी विमानतळाहून सेवा सुरू करण्यात रस दाखविला आहे. एक कंपनी नव्याने भारतात आली आहे. ती कंपनीही सेवा देणार आहे. कंपन्या पूर्ण अभ्यास करून सेवा देण्याबाबत निर्णय घेणार आहेत.
केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालय समितीची सोमवारी विभागीय आयुक्तालयात औरंगाबाद विमानतळाची आंतराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी आणि डोमेस्टिक एअर सर्व्हिस या अनुषंगाने बैठक झाली. बैठकीत इंधनावरील ५ टक्के असलेला व्हॅट आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणातील निधीमधील तफावत याबाबत विमान कंपन्यांनी सवलतींच्या अंगाने चर्चा केली.
बैठकीला खा. चंद्रकांत खैरे, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव उषा पाधी, रुबिना अली, पर्यटन मंत्रालयाचे प्रतिनिधी गंगाधरन, आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, सीएमआयएचे अध्यक्ष राम भोगले, हॉटेल असोसिएशन, टूरिझम प्रमोटेड गिल्ड, ट्रॅव्हल्स असोसिएशनसह ९ विमान कंपन्यांचे सीईओ, प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीची माहिती देताना म्हणाले की, औरंगाबादमध्ये उद्योग, अर्थकारण वाढले; परंतु विमानसंख्या कमी झाली आहे. विमान संख्या आणि प्रवासी वाढण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. हिवाळ्यापासून नवीन विमाने देण्याबाबत कंपन्यांनी मान्य केले आहे. लवकरच त्याची घोषणा कंपन्या करतील. सर्व संघटनांनी औरंगाबादेतील विमान प्रवासासाठी असलेल्या महत्त्वाच्या बाबी विमान कंपन्यांसमोर मांडल्या. मुंबई, दिल्ली, हैदराबादसाठी सध्या ५ विमाने जातात. येणाऱ्या काही महिन्यांत बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, बोधगयासाठी डोमेस्टिक कनेक्टिव्हिटी मिळेल. सार्क व एशियन देशांना औरंगाबाद येथे विमान सुरू करण्यासाठी काहीही अडचण नाही. आंतरराष्ट्रीय विमानसेवाही मिळेल.
...तर दर कमी होणे शक्यऔरंगाबादेतून विमान सेवेचे दर जास्त आहेत. फक्त दिल्ली आणि मुंबई कनेक्टिव्हिटी मागत राहिल्यास तेथे विमान उतरण्यास जागा नाही. त्यामुळे मक्तेदारी निर्माण झाल्याने दर कमी होत नाहीत. बंगळुरू, अहमदाबादकडे जाणारी सेवा मिळाल्यास स्पर्धा निर्माण होईल आणि दर कमी होतील, असा दावा भोगले यांनी केला.