- विजय सरवदे
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दीड वर्षांपासून विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ऑनलाइन तासिका व प्रात्याक्षिके करावी लागत असून, आता घरी बसून शिकण्यासाठी विद्यार्थीही कंटाळले आहेत. अलीकडे कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी कमी झाला आहे. शासकीय तसेच अशासकीय अस्थापना १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षांत विद्यापीठातील शैक्षणिक विभाग व महाविद्यालये उघडावीत व अधिक वेळ न लावता ऑफलाइन तासिका सुरू कराव्यात, अशी अपेक्षा विविध विद्यार्थी संघटनांनी व्यक्त केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी ९, १० व ११ ऑगस्ट रोजी सलग तीन दिवस विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागप्रमुखांची बैठक आयोजित केली आहे. दरवर्षी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याअगोदर विभागप्रमुखांची बैठक घेऊन नवीन अभ्यासक्रम सुुरू करणे, काही जुने अभ्यासक्रम बंद करणे, परीक्षा व तासिकांचे नियोजन केले जाते. मात्र, लॉकडाऊनमुळे मागील दीड वर्षांपासून अध्यापन, प्रात्यक्षिके व परीक्षाही ऑनलाइनच घेण्यात आल्या. यापुढे कोरोनाच्या स्थितीबाबत अनिश्चितताच आहे. त्याुमळे ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षण, प्रात्यक्षिके, परीक्षांबाबत तीन दिवशीय बैठकांमध्ये नियोजन केले जाणार आहे.
दुसरीकडे, ‘यूजीसी’च्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठ व महाविद्यालयांचे ३० ऑगस्टपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होणार असून, १ ऑक्टोबरपासून तासिका सुरू होतील. मात्र, नवीन शैक्षणिक वर्षात विद्यापीठ, महाविद्यालये उघडण्याच्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या, तर याविषयीही सतर्क असले पाहिजे, याविषयीही तीन दिवशीय बैठकीत नियोजन केले जाणार आहे. सध्या विद्यापीठात अध्यापकांच्या मंजूर २५९ पदांपैकी निम्या जागा अर्थात १३० पदे रिक्त असून, १२९ अध्यापक कार्यरत आहेत. गेल्या वर्षी अध्यापनाच्या नियोजनासाठी विद्यापीठाने स्वनिधीतून (विद्यापीठ फंड) १५८ तासिका तत्त्वावरील शिक्षक नियुक्त केले होते. यंदाही अध्यापन प्रक्रियेत अडचण येऊ नये म्हणून विभागनिहाय अध्यापकांच्या स्थितीचा अहवाल कुलगुरुंनी विभागप्रमुखांकडून मागविला आहे.
सर्वकाही सुरू, मग विद्यापीठ, महाविद्यालयेच बंद कायासंदर्भात अभाविपचे निकेतन कोठारी, सम्यक आंदोलनचे प्रकाश इंगळे, ‘एसएफआय’चे लोकेश कांबळे या विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठातील शैक्षणिक विभाग व महाविद्यालये तत्काळ सुरू करावीत, अशी मागणी केली आहे. अलीकडे कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे बाजारपेठा, सार्वजनिक वाहतूक, हॉटेल्स सर्वकाही सुुरू केले आहे. मग, विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षणच बंद कशासाठी. बहुतांशी तरुणांनी लसीकरण केलेले आहे. या विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाच्या उपाययोजनांची समज आहे. अगोदरच ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थी शिक्षणापासून दूर गेले आहेत. त्यामुळे आता बस्स झाले. महाविद्यालये उघडून ऑफलाइन शिक्षण सुरू केलेच पाहिजे, अशी भूमिका या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहेत.