रस्ता वळविल्याने : प्रवेशद्वारासमोरच मृत्यूला आमंत्रण
औरंगाबाद : तुम्ही जाधववाडीतील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य, भाजीपाला आणण्यासाठी वाहनावर जात असाल तर सावधान. कारण मुख्य प्रवेशद्वारातून आत गेला तर समोरच विहीर आहे. या विहिरीला संरक्षक भिंत बांधली नाही. जमिनीलगतची ही विहीर ‘मौत का कुआँ’ ठरू शकते.
जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समिती ही भाजीपाला व धान्याची मोठी अडत, होलसेल बाजारपेठ आहे. येथे दररोज भाजीपाला, धान्य विक्री व खरेदीसाठी हजारो जण येतात. दिवसा धान्य, तर रात्री भाजीपाला विक्रीसाठी शेतकरी, वाहने घेऊन येतात. यामुळे दिवस-रात्र वर्दळ सुरू असते.
मात्र, येथे रस्त्यात एक विहीर आहे, ती सर्वांसाठी धोकादायक ठरत आहे. आंबेडकरनगरकडून कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाताना एक भव्य प्रवेशद्वार तयार केले आहे. या प्रवेशद्वाराकडून सरळ सुमारे २०० फूट आत गेल्यावर दोन रस्ते लागतात. या दोन रस्त्यांमधील जागेत एक जुनी विहीर आहे. पाण्याने भरलेली ही विहीर लगेच दिसत नाही. या विहिरीला संरक्षक भिंत बांधली नाही. एखादा वाहनधारक चुकून सरळ गेला तर या विहिरीत जाऊन पडायचा. ‘नजर हटी दुर्घटना घटी’ अशी येथील अवस्था आहे. या विहिरीला संरक्षक भिंत बांधावी किंवा तारेचे कुंपण करण्याची मागणी होत आहे.
चौकट
रेडियमचा फलक लावा
बाजार समितीने येथे विहीर आहे, असा तरी फलक लावावा. रेडियमचा फलक असेल तर रात्री वाहनधारकांना दिसेल. अशी मागणी व्यापारी व येथे शेतीमाल विक्रीसाठी येणारे शेतकरी करीत आहेत.
कॅप्शन
जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाताना दोन रस्त्यांच्या मध्ये हीच ती विहीर.