खुलताबाद ( छत्रपती संभाजीनगर) : वेरूळ येथील संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या आश्रमात आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे, एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी महामंडलेश्वर शांतिगिरी महाराजांची भेट घेतली. जय बाबाजी भक्त परिवाराचा औरंगाबाद लोकसभा क्षेत्रात मोठा प्रभाव आहे. यामुळे जलील आणि भुमरे यांनी शांतिगिरी महाराज यांच्या भेटीस महत्व आले आहे.
वेरूळ येथील आश्रमात आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जय बाबाजी भक्त परिवाराची राजकीय दृष्ट्या निर्णय घेण्यासंदर्भात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या निमित्ताने महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांची वेरूळ येथे उपस्थिती होती. दरम्यान औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे हे शांतिगिरी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले. तर याचवेळी एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील देखील आश्रमात दाखल झाले. दोन्ही उमेदवारांनी महाराजांची भेट घेतली. या दोघांसह अनेक अपक्ष उमेदवार देखील महाराजांच्या भेटीस येत असल्याने वेरूळचा आश्रम राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू बनला आहे.
पाठिंबा कोणाला? १० मे रोजी ठरणार आज झालेल्या बैठकीमध्ये सात मतदारसंघांमध्ये पाठिंबा कोणास देयचा याचा निर्णय अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर १० तारखेला घेण्यात येणार असल्याचे ठरले आहे. सर्व प्रसिद्धी माध्यमांना १० तारखेला अधिकृतपणे याची माहिती जय बाबाजी भक्त परिवाराकडून कळवण्यात येणार आहे. आज कुठल्याही उमेदवारा संदर्भात निर्णय झालेला नाही, असे राजकीय समितीचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी कळविले आहे. यावेळी जिल्हा संपर्क सेवक शेकनाथ होळकर, जनार्दन रिठे ,राजाभाऊ पानगव्हाणे, राजू चव्हाण कवराजी पाटील, श्रीकांत बोडके, रमेश सागजकर, संदीप मोडके आदीसह जय बाबाजी भक्त परिवाराच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आश्रमात लोकसभा उमेदवारांचा राबताशांतिगिरी महाराज यांची आज दुपारी औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे, एमआयएमचे इम्तियाज जलील, अपक्ष उमेदवार डॉ. जीवन राजपूत, जे. के. जाधव, संजय भास्कर शिरसाट यांनी भेट घेतली. तसेच शिर्डी लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार भारत संभाजी भोसले यांनी देखील आज शांतिगिरी महाराजांची भेट घेतली.