वाळूज महानगर : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मंगळवारी वाळूज महानगरात जयंती उत्सव समिती व मित्र मंडळांतर्फे ढोल-ताशा आणि डिजेच्या गजरात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढून साजरी करण्यात आली. यावेळी शिवपे्रमींच्या जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने उद्योगनगरी दुमदुमून गेली.
बजाजनगरात जय हिंद मित्र मंडळ व हिंदु धर्म रक्षक मित्र मंडळातर्फे रथाची सजावट करुन व त्यावर आकर्षक रोषणाई करण्यात आली. रथामध्ये शिवाजी महाराज यांचा पुतळा विराजमान करण्यात आला. शिवाजी महाराजांना अभिवादन करुन व शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करुन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मुख्य मार्गावरुन निघालेल्या मिरवणुकीत भगवे फेटे बांधलेले तरुण हातात भगवा ध्वज घेवून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहभागी झालेले तरुण गुलालाची उधळण व जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करीत बेभान होऊन थिरकत होते. तरुणाईच्या गगनभेदी घोषणांनी परिसर अक्षरश: दणाणून गेले होता.
मीनाताई ठाकरे भाजी मार्केट शिवजयंती उत्सव समिती, छावा संघटनेतर्फे आलेल्या मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. बजाजनगरातील मुख्य मार्गावरुन निघालेल्या मिरवणुका पाहण्यासाठी परिसरातील आबाल वृद्धांसह नागरिकांनी गर्दी केल्याने मुख्य रस्ते फुलून गेले होते. मिरवणुकीच्या मार्गावर महिलांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. वडगाव कोल्हाटी येथे संत कान्होपात्रा, रांजणगाव येथे शिवस्वराज्य प्रतिष्ठाण, सिडको वाळूज महानगर शिवजयंती उत्सव समिती, जोगेश्वरी शिवजयंती उत्सव समिती, पंढरपूर शिवजयंती उत्सव समिती, वळदगाव शिवजयंती उत्सव समिती, वाळूज येथे संघर्ष प्रतिष्ठाण आदी विविध जयंती उत्सव समिती व मित्र मंडळातर्फे मिरवणुका काढण्यात आल्या. दरम्यान, शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेतील लहान मुले, तरुण आदी आकर्षणाचे केंद्र ठरले. यावेळी वाळूज व वाळूज एमआयडीसी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.