पैठण : जायकवाडी धरणात गेल्या दोन दिवसांपासून विक्रमी आवक होत होती; मात्र शुक्रवारी (दि.५) आवक घटत असल्याचे दिसून आले. गुरुवारी (दि.४) धरणात १,५०,८३२ क्युसेक एवढ्या मोठ्या क्षमतेने आवक सुरू होती, ती आज ४४,०९९ क्युसेकपर्यंत घटली. शुक्रवारी सायंकाळी ७ वा. धरणात ३१% जलसाठा झाला होता. धरणात होणारी आवक लक्षात घेता शनिवारी सायंकाळपर्यंत धरणात ३५% जलसाठा होण्याची अपेक्षा धरण नियंत्रण कक्षातून अभियंता अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीने या भागातील धरण समूहातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत होता. यामुळे नाशिक ते पैठणदरम्यान गोदावरीला महापूर आला असून, जायकवाडी धरणात हे पुराचे पाणी दाखल होत आहे. नाशिक भागातील पावसाचा जोर मंदावल्याने वरील धरणातून होणारा विसर्ग गुरुवारी मध्यरात्रीपासून घटविण्यात येत आहे. यामुळे धरणात येणारी आवक घटत चालली आहे. १५२२ फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडीची जलपातळी गुरुवारी सायंकाळी ७ वाजता १५०६.०६ फुटापर्यंत पोहोचली होती. धरणाच्या उपयुक्त जलसाठ्यात ११.५६ फुटाने वाढ झाली असून धरणात एकूण जलसाठा १३९८.४१८ दलघमी (४९.३७ टीएमसी) एवढा झाला आहे. यापैकी उपयुक्त जलसाठा ६६०.३१२ दलघमी (२३.३१ टीएमसी) एवढा झाला आहे.
जायकवाडी ३१ टक्क्यांवर
By admin | Published: August 06, 2016 12:20 AM