ऋचिका पालोदकर औरंगाबाद : महाराष्ट्रातील पाणतळीचे सगळ्यात मोठे पक्षी अभयारण्य म्हणून जायकवाडीकडे पाहिले जाते. पण प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे स्थानिक लोकांची अतिक्रमणे फोफावली आणि पक्ष्यांची संख्या रोडावली आहे.पाण्याजवळ येताच पक्ष्यांच्याही आधी येथील मासेमारीच्या जाळ्या, गाळपेऱ्यात फुललेली शेती आणि खराब कपडे, प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकोलचा कचरा लक्ष वेधून घेतो. गाळपेºयात शेती केली जात असल्यामुळे पिकांवर कीटकनाशके फवारण्यात येतात. यातील काही जमिनीत मिसळून पाण्यात जातात. हे जलचर आणि पक्ष्यांसाठी अपायकारक असल्याने त्यांची संख्या घटली आहे. याशिवाय मासेमारीच्या जाळ्या ठिकठिकाणी पाण्यात सोडलेल्या असून, यातही पक्षी अडकून दगावतात. मानवी हस्तक्षेपामुळे मागच्या १० ते १२ वर्षांत पक्ष्यांचे प्रमाण प्रचंड घटले आहे. पूर्वी येथे ४० ते ५० हजार फ्लेमिंगो पक्षी दिसायचे. ही संख्या आता अवघ्या १-२ हजारांवर आली आहे.डीएमआयसी प्रकल्पासाठी पाणीपुरवठा करण्याचे काम येथे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे येथे कामगार राहतात. या प्रकल्पासाठी सुरू असणारे बांधकाम, सुरुंगांचे स्फोट, यामुळेही पक्ष्यांच्या संख्येवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झाल्याचे पक्षीतज्ज्ञ डॉ. किशोर पाठक यांनी सांगितले.>180 पेक्षाही अधिक प्रजातीयेथे स्थानिक, स्थलांतरित पक्ष्यांच्या एकूण १८० पेक्षाही अधिक प्रजाती आहेत. फ्लेमिंगो (रोहित) पक्षी येथील मुख्य आकर्षण असून, हिवाळ्यात येणारे मत्स्य गरूड, रंगीत करकोचा, लालसरी बदक, फापड्या बदक यासह कृष्णकौंच, तुतारी, तुतवार, पाणलावा, बदक व गरुडांचे विविध प्रकार, माळभिंगरी, कमळ, नीलकमळ, विविध सूरय जातीचे पक्षी मध्य आशिया, सायबेरिया, युरोप, रशिया, चीन, तिबेट येथून येतात. हळद- कुंकू बदक, पाणकावळे, ब्राह्मणी घार, वारकरी बदक, पाणकोंबड्या, नदीसूरय, शिरवा हे येथील स्थानिक पक्षी आहेत. लडाख, उत्तरांचल, दक्षिणेकडील राज्यातूनही अनेक पक्षी येतात.>अक्षम्य दुर्लक्षनिसर्गाने भरभरून दिले आहे; पण वनखाते, सिंचन विभाग आणि महसूल खाते यांचे अक्षम्य दुर्लक्ष याठिकाणी दिसून येते. यामुळे कधी काळी लाखोंच्या संख्येत येणारे पक्षी आता केवळ हजारोंच्या संख्येतयेतआहेत.- डॉ. किशोर पाठक, पक्षीतज्ज्ञ>मनुष्यबळाची कमीमासेमारीच्या माध्यमातून परिसरातील गोरगरीब लोक त्यांचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण अनेकदा लपून- छपून हे लोक मासेमारी करायला येतात. आमच्याकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे नियंत्रण ठेवायला कोणी नाही. - संजय भिसे,वन परिक्षेत्र अधिकारी
जायकवाडी पक्षी अभयारण्य अतिक्रमणांच्या विळख्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 4:56 AM