पैठण : नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात शनिवारपासून मुसळधार पाऊस सुरू असून, दोन्ही जिल्ह्यांतील धरण समूहातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे गोदावरी व प्रवरा नद्या वाहत्या झाल्या आहेत. रविवारी मध्यरात्री गोदावरीचे पाणीजायकवाडी धरणात दाखल झाले असून, सोमवारी सायंकाळी ८६५७ क्युसेक क्षमतेने आवक सुरू होती.
धरणाची पाणीपातळी आज रोजी ८७.४७ टक्के एवढी होती. दरम्यान, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने मंगळवारी जायकवाडी धरणात आवक वाढण्याची अपेक्षा धरण अभियंता संदीप राठोड यांनी व्यक्त केली. गेल्या दोन दिवसांत जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक व नगर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढल्याने तेथील धरण समूहांतून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे.
गंगापूर धरणातून ३४२६ क्युसेक, दारणा धरणातून ११८०६ व नांदूर-मधमेश्वर वेअरमधून गोदावरीत १२१६६ क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. भंडारदरा धरणातून १९४७६ क्युसेक, निळवंडे धरणातून २७४९८ क्युसेक व ओझर वेअरमधून ६३०१ क्युसेक विसर्ग सोमवारी सुरू होता. प्रवरेचे पाणी मंगळवारी जायकवाडी धरणात दाखल होईल. यानंतर येणारी आवक वाढणार असल्याने जलाशयात पुन्हा वाढ होणार असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.