परभणी : वीस हजार रुपयांची लाच घेताना कारागृह अधीक्षक सतीश कदम आणि तुरुंग अधिकारी किशोर वारगे यांना औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
यासंदर्भात औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराचा मेहुणा फसवणुकीच्या गुन्हा प्रकरणात जिल्हा कारागृहात आहे. त्यांना कारागृहातील अंडा बॅरेकमध्ये न ठेवण्यासाठी व त्रास न देण्यासाठी प्रभारी कारागृह अधीक्षक कदम व तुरुंग अधिकारी वारगे यांनी २५ हजाराच्या लाचेची मागणी केली. त्यावर तक्रारदारांनी औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या अनुषंगाने १८ ऑक्टोबर रोजी परभणी जिल्हा कारागृह परिसरात सापळा लावण्यात आला. या ठिकाणी प्रभारी कारागृह अधीक्षक कदम अणि तुरुंग अधिकारी वारगे यांनी प्रत्येकी १0 हजार याप्रमाणे २0 हजार पंच व साक्षीदारासमक्ष लाचेची मागणी करुन ती तुरुंग अधिकारी वारगे यांच्यामार्फत स्वीकारल्यानंतर रंगेहाथ पकडण्यात आले. त्यावरुन दोन्ही आरोपींविरुद्ध नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षकांनी दिली.