छत्रपती संभाजीनगर : जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याची कामे गुणवत्तापूर्वक आणि जलदगतीने व्हावीत, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना हे सातत्याने अपडेट घेत आहेत. दरम्यान, या योजनेंतर्गत १ हजार ११६ कामांपैकी आजपर्यंत ५७२ कामे पूर्णत्वास आली असून, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या त्रयस्थ संस्थेने नुकत्याच केलेल्या तांत्रिक परीक्षणात ३३० कामे उत्कृष्ट, तर ३० कामे समाधानकारक असल्याचा अभिप्राय दिला आहे.
केंद्र सरकारने ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलजीवन मिशन हाती घेतले आहे. ज्या गावांना सातत्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, अशी गावे जलजीवन मिशनच्या आराखड्यात प्राधान्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. या मिशन अंतर्गत जिल्ह्यातील १२४१ गावांसाठी ११६१ योजनांची कामे हाती घेण्यात आली असून, यासाठी ६७७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
दरम्यान, जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत हाती घेण्यात आलेली सर्व कामे मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रशासन लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५७२ कामे पूर्णत्वास आली असून, या कार्यक्रमांतर्गत कामांचा गुणात्मक दर्जा तपासण्यासाठी राज्य शासनाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या त्रयस्थ संस्थेची नेमणूक केली आहे. या संस्थेने ५०१ कामांना भेटी दिल्या. यापैकी ३३० कामे उत्कृष्ट, ३० कामे समाधानकारक असल्याचा अभिप्राय दिला आहे, तर काही कामांमध्ये त्रुटी निघाल्या आहेत. आणखी ५३६ कामांच्या दर्जाचे परीक्षण लवकरच होईल, असे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांनी सांगितले.
३३२ गावांना पाणीपुरवठा सुरूजिल्ह्यातील पूर्णत्वास आलेल्या ५७२ कामांपैकी ३३२ गावांना पाणीपुरवठाही सुरू करण्यात आला आहे. सध्या १४८ योजना १ ते २५ टक्के, २६२ कामे २६ ते ५० टक्के, १७९ कामे ५१ ते ७५ टक्क्यांपर्यंत प्रगतिपथावर आहेत. ३८९ कामे ७६ ते ९९ टक्क्यांपर्यंत अर्थात पूर्णत्वाकडे आली असून, १८३ कामे १०० टक्के पूर्ण झाली आहेत.