-शिवचरण वावळेJalana Lok Sabha Result 2024: जालना: नुकतेच जालना लोकसभा मतदारसंघाच्या 2024 च्या निकालाची बाराव्या फेरीचे निकाल हाती आले आहेत. यात कॉग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांच्यापेक्षा ३४ हजार ११३ मतांची लीड मिळविल्याने कॉँग्रेसमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच विजयी गुलाल उधळण्याची तयारी सुरू केली आहे.
दरम्यान मतमोजणी केंद्राच्या मुख्य गेट समोर काळे समर्थकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या उत्साही कार्यकर्त्यांना मतमोजणी गेटसमोरुन बाजूला करण्यासाठी दंडुका दाखवावा लागला आहे.
काँग्रेसचे कल्याण काळे यांनी दोन लाख ८५ हजार २९७ तर भाजपचे रावसाहेब दानवे यांनी दोन लाख 60 हजार 233 मते मिळवली आहेत. अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी ७७ हजार ५५७ मिळवत सर्वाधिक मते मिळवणारे तिसरे उमेदवार ठरले आहेत.
दुपारी दीडनंतर उन्हाचे चटके जाणवू लागल्याने कार्यकर्त्यांनी सावलीसाठी मतमोजणी केंद्राबाहेर दिसेल त्या झाडाचा आसरा घेतला. वातावरण शांत झाल्यासारखे वाटत असतानाच उन्हाची तीव्रता कमी होताच कार्यकर्त्यांनी रोडवर जमण्यास सुरुवात केली आहे. तर काही उत्साही कार्यकर्ते हे आतापासूनच गुलाल उधळण्याच्या तयारीला देखील लागले आहेत. अजून 12 फेऱ्याचे निकाल हाती येणे बाकी असतानाच ऊन सावलीच्या या खेळात कुणाला चटका बसणार तर, कुणासाठी आल्हाददायक वातावरण ठरणार ही काही तासांतच ठरले.